भारताने आता पाकिस्ताननंतर चीनला लक्ष्य केले असून चीनवर डिजिटल स्ट्राइक सुरू केला आहे. भारत सरकारने बुधवार, १४ मे रोजी चीनच्या सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’च्या एक्स अकाउंटवर देशात बंदी घातली आहे. चीनच्या मुखपत्रातून सतत पसरवल्या जाणाऱ्या प्रचारामुळे भारताकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. ग्लोबल टाईम्सकडून सातत्याने पसरवल्या जाणाऱ्या प्रचाराबाबत भारतीय दूतावासाने त्यांना कडक इशारा दिला होता. मात्र, चीनचा अजेंडा रेटण्याचे काम चालूचं राहिल्यामुळे अखेर भारत सरकारने ठोस पाऊल उचलत ही कारवाई केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानी मीडिया आणि काही सोशल मीडिया अकाउंट्सनी असा दावा केला होता की भारतीय हवाई दलाचे राफेल विमान बहावलपूरजवळ पाडण्यात आले. ग्लोबल टाईम्सवर हे खोटे दावे पसरवण्याचा आणि ठळकपणे प्रकाशित करण्याचा आरोप आहे.
७ मे रोजी, चीनमधील भारतीय दूतावासाने या मीडिया आउटलेटला सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी तथ्ये पडताळून पाहण्याचा कठोर इशारा दिला होता. “ग्लोबल टाईम्स न्यूज, आम्ही शिफारस करतो की तुम्ही अशा प्रकारची चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी तुमच्या तथ्यांची पडताळणी करा आणि तुमच्या स्रोतांची उलटतपासणी करा,” असे दूतावासाने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील बिघडत्या संबंधांमध्ये, चीन खोटा प्रचार करण्यापासून परावृत्त होत नसून भारताविरुद्ध प्रचार करण्यासाठी चीन ग्लोबल टाईम्सचा वापर करत होता. त्यामुळे भारत सरकारने ग्लोबल टाईम्सचे एक्स-अकाउंट ब्लॉक केले आहे. आता भारतात त्यांच्याकडून चालवला जाणारा प्रचार पाहू शकणार नाही.
कर्नल सोफिया कुरेशींच्या घरावर हल्ल्याची खोटी बातमी; आरएसएसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न!
“नामकरणामुळे अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे वास्तव बदलणार नाही”
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी गीतेवर हात ठेवून घेतली शपथ; कोण आहेत अनिता आनंद?
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीपदाची शपथ
दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे चीनने बदलण्याचा प्रयत्न केला. यावर भारताने चीनला खडसावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, “आम्हाला असे आढळून आले आहे की चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे ठेवण्याचे त्यांचे व्यर्थ आणि हास्यास्पद प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेशी सुसंगत राहून, आम्ही अशा प्रयत्नांना स्पष्टपणे नकार देतो. नामकरणामुळे अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील हे निर्विवाद वास्तव बदलणार नाही.”
