दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) सह-संस्थापक दहशतवादी अमीर हमजा याच्यावर पाकिस्तानात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे. लाहोरमधील रुग्णालयात हमजा उपचार घेत असल्याची माहिती आहे. माहितीनुसार, ६६ वर्षीय हमजा हा त्याच्या घरी गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर त्याला आयएसआयच्या सुरक्षा कवचात लाहोरमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लष्कर-ए-तोयबाच्या १७ संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या हमजाला त्याच्या घरात अपघात होऊन दुखापत झाली आहे. काही अहवालानुसार, त्याला गोळी लागल्याने दुखापत झाली असून याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
अमीर हमजा हा अफगाण मुजाहिद्दीनचा अनुभवी नेता असून त्याला लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख म्हणूनही ओळखले जाते. तसेच ज्वलंत भाषणांसाठी आणि लेखनासाठीही हमजा याचे नाव आहे. शिवाय एकेकाळी लष्कर-ए-तोयबाच्या अधिकृत प्रकाशनाचा संपादक म्हणूनही त्याने काम केले आहे. त्याने २००२ मध्ये काफिला दावत और शहादत (धर्मांतर आणि शहीदांचा कारवां) यासह अनेक पुस्तके लिहिली आहेत.
हे ही वाचा:
आजा पाकिस्तानी, बाप काँग्रेसी, नाव अलीखान महमुदाबाद, धंदे समाजवादी
पाकला लपण्यासाठी जागाही मिळणार नाही…ते आपल्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात!
राजधानी एक्स्प्रेसला घातपात करण्याचा होता कट
छगन भुजबळांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटने लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे आणि अमीर हमजा याला प्रतिबंधित दहशतवादी म्हणून सूचीबद्ध केले आहे. तो लष्कर-ए-तोयबाच्या केंद्रीय समितीत काम करत होता आणि निधी संकलन, भरती आणि वाटाघाटींमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते. २०१८ मध्ये, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी लष्कर-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनशी संबंधित धर्मादाय संस्थांवर आर्थिक कारवाई केल्यानंतर, हमजाने लष्करपासून स्वतःला दूर केले होते. त्यानंतर त्याने जम्मू आणि काश्मीरसह इतरत्र दहशतवादी कारवाया सुरू ठेवण्यासाठी जैश-ए-मनकाफा नावाचा एक वेगळा गट स्थापन केला. भारतीय माध्यमांनुसार, हा गट पाकिस्तानमध्ये मुक्तपणे कार्यरत आहे आणि हमजा लष्कर-ए-तोयबाच्या नेतृत्वाशी जवळच्या संपर्कात आहे.







