अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अपेक्षांना धक्का देत, २०२५चा नोबेल शांतता पुरस्कार शुक्रवारी व्हेनेझुएलाच्या मुख्य विरोधी नेत्या मारिया कोरिना मच्याडो यांना जाहीर करण्यात आला. सध्या मच्याडो या लपून राहिलेल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सत्तापरिवर्तनाच्या प्रयत्नात मच्याडो या महत्त्वाची भूमिका बजावत होत्या.
५८ वर्षीय मच्याडो, ज्यांना “व्हेनेझुएलाची आयर्न लेडी” म्हणून ओळखले जाते, लोकशाही अधिकारांच्या लढ्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्या नुकत्याच टाइम मॅगझिनच्या प्रभावी १०० लोकांच्या यादीत त्यांनी स्थान मिळविले आहे.
आठ युद्धे संपवल्याचा दावा ठरला फोल
हा निर्णय नक्कीच ट्रम्प यांना खटकणारा आहे. त्यांनी स्वतःला “आठ युद्धे संपवणारा नेता” म्हणून गौरविले होते आणि त्यासाठी नोबेल पुरस्कारासाठी आपण खऱ्या अर्थाने पात्र असल्याचे वारंवार सांगितले होते. तरीही, मच्याडो यांची निवड त्यांना फारसा राजकीय तोटा पोहोचवणार नाही. अलीकडच्या महिन्यांत ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील मादुरो शासनाविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून अमली पदार्थ तस्करी प्रकरणावरून राजनैतिक संबंध तोडले आहेत. त्यांच्या या हालचालींमुळे अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये सत्ता परिवर्तनाच्या प्रयत्नांना चालना दिली आहे, अशी अटकळ वर्तवली जात आहे.
ऑगस्ट महिन्यात मच्याडो यांनी ट्रम्प यांचे आभार मानले होते, कारण अमेरिकेने तेव्हा मादुरोच्या अटकेसाठी जाहीर केलेले बक्षीस २५ दशलक्ष डॉलरवरून वाढवून ५० दशलक्ष डॉलर केले होते. “आम्ही व्हेनेझुएलावासी अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाचे आभार मानतो. त्यांनी आमच्या देशावर कब्जा करून बसलेल्या गुन्हेगारी आणि दहशतवादी रचनेविरुद्ध ठाम भूमिका घेतली, असे मच्याडो यांनी त्यावेळी एक्सवर पोस्ट केले होते.
हे ही वाचा:
“कर्जमाफीचा नाद लागलाय” सहकार मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
तालिबानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर असताना पाकचा काबुलवर हवाई हल्ला
झिशान सिद्दीकींना धमकी देणाराचं रिंकू सिंगकडे मागत होता ५ कोटी!
फिलीपिन्समध्ये ७.६ तीव्रतेचा भूकंप!
मारिया मच्याडो आहेत कोण?
नोबेल समितीने पुरस्कार जाहीर करताना सांगितले की, मच्याडो यांना “व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाही अधिकारांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे शांततामय संक्रमणासाठी केलेल्या संघर्षासाठी” सन्मानित केले जात आहे.
समितीने त्यांचे वर्णन “धाडसी आणि शांततेच्या कट्टर समर्थक” म्हणून केले, “अंधार वाढत असताना लोकशाहीची ज्योत जिवंत ठेवते, अशी मच्याडो यांची तुलना नोबेल पुरस्कार समितीने केली आहे. गेल्या काही वर्षांपासून मच्याडो या व्हेनेझुएलाच्या लोकशाही चळवळीतील प्रमुख चेहरा राहिल्या आहेत. त्यांनी मादुरोच्या सत्तेसाठी हपापलेल्या राजवटीला सतत आव्हान दिले आहे. त्यांना धमक्या, अटक, प्रवासबंदी आणि राजकीय छळ सहन करावा लागला, तरी त्या देश सोडून गेल्या नाहीत.
२०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत मच्याडो यांना स्पर्धेतून बार करण्यात आले. विरोधकांनी विजयाचा दावा केला तरी मादुरो यांनी स्वतःला विजेता घोषित केले आणि विरोधकांवर दडपशाही सुरू केली, ज्यामुळे मच्याडो यांना लपावे लागले.
मच्याडो या वेन्टे व्हेनेझुएला या उदारमतवादी राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आहेत, या पक्षाची स्थापना त्यांनी २०१३ मध्ये केली. त्या २०१० ते २०१५ दरम्यान राष्ट्रीय सभेच्या सदस्य होत्या.
ट्रम्पसाठी याचा अर्थ काय?
ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांपासून नोबेल शांतता पुरस्कारासाठी जोरदार मोहिम चालवली होती. त्यांना वाटत होते की, अब्राहम अकॉर्ड्स आणि त्यांच्या “युद्धविराम प्रयत्नांमुळे” त्यांचे नाव अमेरिकेच्या आधीच्या नोबेल विजेत्यांमध्ये — थिओडोर रुझवेल्ट, वुडरो विल्सन, जिमी कार्टर आणि बराक ओबामा — जोडले जाईल. मात्र, नोबेल समितीचे अध्यक्ष जोर्गेन वॉटने फ्रिडनेस यांनी स्पष्ट सांगितले, “आमचे निर्णय केवळ अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेवर आणि कार्यावर आधारित असतात. प्रचार मोहिमा किंवा माध्यमांच्या गाजावाजाचा त्याच्यावर परिणाम होत नाही.”
तसेच, ट्रम्प यांना या वर्षी पात्र ठरविण्याची संधीच नव्हती, कारण नोबेलसाठी नामनिर्देशन ३१ जानेवारीला बंद झाले होते — म्हणजेच ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दहा दिवसांनी. त्यामुळे त्यांनी दावा केलेली “आठ युद्धे सोडवली” ही घोषणा समितीच्या विचारात आलीच नाही. न्यूयॉर्कच्या कॉंग्रेसवुमन क्लॉडिया टेनी यांनी ट्रम्प यांचे एकमेव वैध नामनिर्देशन केले होते, त्यात त्यांनी अब्राहम अकॉर्ड्समधील भूमिकेचा उल्लेख केला होता.







