युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार कर लादण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. रशियाशी व्यापारी संबंध असलेल्या व्यापारी भागीदारांवर कर लादण्याचे समर्थन झेलेन्स्की यांनी केले असून या कृतीला त्यांनी उत्तम कल्पना असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात चीनमध्ये झालेल्या बैठकीबद्दल विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील शुल्क दुप्पट करून तब्बल ५० टक्के केले आहे. भारताने अमेरिकेच्या या कृतीचा निषेध केला असून दरम्यान नवी दिल्लीने युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी सातत्याने आवाहन देखील केले आहे. झेलेन्स्की यांनी मॉस्कोसोबत ऊर्जा व्यापार सुरू ठेवल्याबद्दल युक्रेनच्या युरोपीय भागीदारांवरही टीका केली आणि ते म्हणाले, “पुतिन यांच्य्यावर अतिरिक्त दबाव आणण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेकडून दबाव आणण्याची आवश्यकता आहे. काही भागीदार हे तेल आणि रशियन वायू खरेदी करत असून हे न्याय नाही. त्यामुळे रशियाकडून कोणत्याही प्रकारची ऊर्जा खरेदी करणे थांबवावे लागेल. रशियाशी करार करत राहणाऱ्या देशांवर शुल्क लावण्याची कल्पना योग्य आहे.”
हे ही वाचा :
हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात दगडफेक; सात जणांच्या आवळल्या मुसक्या
शशी थरूर म्हणतात, भारत झुकेगा नही!
युवकांना रोजगाराशी जोडण्यासाठी मिशन मोडमध्ये योगी सरकार
दरम्यान, अलिकडच्या आठवड्यात, भारताने युक्रेन युद्ध संपवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झेलेन्स्की यांच्याशी दोनदा चर्चा केली. नरेंद्र मोदी म्हणाले होते की, या संघर्षावर लवकर आणि शांततापूर्ण निराकरणाच्या गरजेबद्दल भारताची सातत्यपूर्ण भूमिका मांडली. भारत या संदर्भात शक्य तितके सर्व योगदान देण्यास तसेच युक्रेनसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही त्यांचे युक्रेनियन समकक्ष आंद्री सिबिहा यांच्याशी चर्चा केली आणि सांगितले की, भारत या संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी आणि कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाठिंबा देतो आहे.







