पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) भारत विरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये हमास या दहशतवादी संघटनेचे नेते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या हमासच्या नेत्यांचे स्वागत दहशतवादी संघटना असलेल्या जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) दहशतवाद्यांनी केले. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जैश आणि लष्कर या दोन्ही गटांच्या दहशतवाद्यांकडून हमास नेत्यांचा चांगलाच पाहुणचार केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यांना व्हीआयपी वागणूकीसह अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत. हमासचे नेते एका आलिशान एसयूव्हीमधून रावळकोटमधील शहीद साबीर स्टेडियममध्ये जात असल्याचे दिसत आहे. या एसयूव्हीच्या पुढे आणि मागे जैश आणि लष्करचे दहशतवादी बाईक आणि घोड्यांवर दिसत आहेत. एखाद्या रॅलीप्रमाणे हे दहशतवादी आपल्या गाड्या घेऊन जात आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, जैश आणि लष्करचे दहशतवादी पॅलेस्टिनी झेंडे घेऊन बाईक आणि घोड्यांवर बसलेले दिसत आहेत. तसेच हमास नेते येताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जात आहे.
हे ही वाचा :
हद्दपारी यापूर्वीही होती, बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांना मायदेशी घेणे ही जबाबदारी!
करुणा शर्मा नव्हे आता करुणा मुंडे, धनंजय मुंडेंनी पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश!
गुगलकडून नवीन फ्लॅगशिप एआय मॉडेल
भारत विरोधी ही परिषद ५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या दिवशी पाकिस्तान ‘काश्मीर एकता दिन’ म्हणून साजरा करतो. भारतविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी ही एक प्रचार मोहीम होती. या कार्यक्रमाला लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) दहशतवादी हाफिज मुहम्मद सईद याचा मुलगा हाफिज तल्हा सईद आणि जैश कमांडर असगर खान काश्मिरी यांच्यासह अनेक दहशतवादी नेते उपस्थित होते. यावेळी हाफिज तल्हा सईद याने प्रक्षोभक भाषण केल्याचे समोर आले. सभेला संबोधित करताना तल्हा याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेत त्यांना इशारा दिला आहे. “मी पंतप्रधान मोदींना इशारा देतो की काश्मीर मुस्लिमांचा आहे आणि आम्ही तुमच्याकडून काश्मीर हिसकावून घेऊ. लवकरच पाकिस्तानचा भाग होईल,” असे तल्हा म्हणाला. त्याने पुढे लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून जागतिक स्तरावर घोषित करण्याचा निर्णय फेटाळून लावला आहे. शिवाय दावा केला की, हा केवळ त्यांच्या वडिलांना बदनाम करण्यासाठी मोदींचा प्रचार होता.