संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात भारतीय वंशाच्या गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांना त्यांच्या ‘त्रिवेणी’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला. रेकॉर्डिंग अकादमीकडून आयोजित ६७ वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम एरिना येथे आयोजित करण्यात आला होता.
चंद्रिका टंडन यांनी त्यांच्या ‘त्रिवेणी’ अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट न्यू एज, ॲम्बियंट किंवा चांट अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास घडवला. या अल्बममध्ये सात गाणी असून ध्यानसाधनेसाठी आणि मनःशांतीसाठी त्यांची रचना केल्याचे टंडन सांगतात. प्राचीन मंत्र आणि जागतिक संगीत यांचा सुंदर मिलाफ या अल्बममध्ये पहायला मिळतो. या अल्बममध्ये चंद्रिका टंडन यांनी दक्षिण आफ्रिकेतील बासरी वादक वॉटर केलरमन आणि जपानी सेलिस्ट (वादक) एरु मात्सुमोतो यांच्यासोबत मिळून वैदिक मंत्र सादर केले आहेत. तीन नद्यांच्या संगमावरून या अल्बमला ‘त्रिवेणी’ असं नाव दिले आहे. त्याचप्रमाणे यामध्ये तीन वेगवेगळ्या शैलींचंही प्रतिनिधीत्व करण्यात आलं आहे. संगीत म्हणजे प्रेम, संगीत आपल्या सर्वांमध्ये प्रकाश प्रज्वलित करते आणि आपल्या आयुष्याच्या अंधाऱ्या काळातही संगीत आनंद आणि हास्य पसरवते, अशा शब्दांत चंद्रिका टंडन यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. पुरस्कार प्राप्त झाल्यावर त्यांनी म्हटले आहे की, या कॅटेगरीमध्ये अद्भुत नामांकन होते. पुरस्कार जिंकलो हा आमच्यासाठी खरोखरच एक खास क्षण आहे. आमच्यासोबत नामांकित झालेले उत्कृष्ट संगीतकार होते, असे चंद्रिका टंडन यांनी म्हटले आहे. २००९ च्या ‘सोल कॉल’ला मिळाल्यानंतर टंडन यांचे हे दुसरे ग्रॅमी नामांकन होते.
चंद्रिका टंडन कोण आहेत?
चंद्रिका टंडन या प्रसिद्ध उद्योजिका आणि पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांची बहीण असून त्यांनी स्वतः संगीत आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. एक संगीतकार आणि गायिका म्हणून टंडन यांनी हिंदुस्तानी आणि पाश्चात्य संगीत परंपरांचे मिश्रण केले आणि समृद्ध केले. त्यांचा पहिला स्टुडिओ अल्बम, ‘सोल कॉल’ यालाही सर्वोत्कृष्ट समकालीन जागतिक संगीतासाठी ग्रॅमी नामांकन मिळाले होते.
हे ही वाचा :
संभलमधील सरकारी तलावातील बेकायदेशीर मजार हटवली!
वांद्रे टर्मिनसमधील रिकाम्या ट्रेनच्या डब्यात महिलेवर अत्याचार; हमाल आरोपीला अटक
गोध्रा ट्रेन हत्याकांड: पॅरोलवर असताना फरार झालेल्या जन्मठेपेच्या आरोपीला पुण्यातून अटक
दिल्लीत आपचे ‘अर्ध इंजिन सरकार’
चेन्नईमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात चंद्रिका यांचा जन्म झाला. मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. टंडन या एक यशस्वी व्यावसायिक महिलादेखील आहेत. गायिका आणि यशस्वी उद्योजिका असा प्रवास त्यांच्या बहुआयामी प्रतिभेचे उदाहरण देतो. ग्रॅमीमध्ये त्यांना मिळालेला सन्मान हा त्यांच्यासाठी आणि जागतिक स्तरावरील भारतीय प्रतिभेसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. संगीत, व्यावसायिक कुशाग्रता यांच्यात समन्वय साधण्याची त्यांची क्षमता अधोरेखित होते.