भक्ती म्हणजे केवळ देवप्रेम नव्हे, ती माणसाच्या आतल्या शक्तीला जागं करून अचंबित करणारी कामगिरी घडवू शकते, याची अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात सापडतात. अशाच एका विलक्षण कार्याची अनुभूती आपणास लंडनमधून मिळते — २००८ पासून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या अनिल खेडकर, तुषार गाडीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, विठ्ठलमाऊलींच्या चांदीच्या पवित्र पादुका पंढरपूरातून साक्षात लंडनपर्यंत २२ देशांमधून, १८००० किमी प्रवास करून, ७० दिवसांत पोहचवल्या.
या दिंडीचा उद्देश केवळ पादुकांचा प्रवास नव्हता, तर विठ्ठलभक्तीची, भारतीय अध्यात्माची आणि संस्कृतीची गूढता जगभर पोहोचवण्याचा होता. “रामकृष्ण हरी”च्या गजरात, हरिनामाच्या ओंजळीतून त्यांनी जे पेरलं, ते श्रद्धेचं बीज आज अनेकांच्या मनामनात अंकुरत आहे. या भक्तांनी लंडनमध्ये भव्यदिव्य विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभं करण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे — तो देखील या दिंडीइतकाच प्रेरणादायी.
जगभर विविध पंथांच्या प्रसारासाठी केले जाणारे प्रयत्न आपण पाहतो. पण भारतीय संस्कृतीची जीवनदृष्टी, तिची अध्यात्मिक परंपरा आणि मानवी मूल्यांची गाथा जगासमोर प्रभावीपणे मांडण्यात आपण नेहमीच कमी पडतो. खेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला हा प्रयत्न केवळ कौतुकास पात्र नाही, तर तो अनुकरणीय ठरतो. या ७० दिवसांच्या प्रवासात भाविकांनी अनुभवलेली भक्तीची अनुभूती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर प्रकट झाली आहे. त्यांच्या पोस्ट्स आणि व्हिडिओजमधून जागवलेला विठ्ठलप्रेम पाहणाऱ्यांच्या मनातही तोच भाव जागवतो. कारण वारी ही केवळ पायी चालत जाण्याची परंपरा नाही, ती श्रद्धेचा, एकतेचा आणि प्रेमाचा आत्मिक प्रवास आहे. आणि ही दिंडी, हा प्रवास — त्याच भक्तीची जागतिक आवृत्ती आहे.
हे ही वाचा:
भारतात पहिल्यांदा साजरा झाला ‘वन्य प्राणी दिवस’
गोपाल खेमका हत्या प्रकरण : सत्य लवकरच येणार समोर
मृत्यूनंतरही बीएसएफ जवानाने दिले ४ जणांना नवीन जीवन…
विश्ववारी
महाराष्ट्रातील वारीची परंपरा सातशे वर्षांपासून अखंड सुरू आहे. मात्र कोविड काळात दोन वर्षांचा खंड पडला. २०१७ पासून वारीशी जोडले गेलेले खेडकर हे इंग्लंडस्थित भाविक, त्यांनीच या काळात ‘व्हर्च्युअल वारी’ची कल्पना प्रत्यक्षात आणली. तेव्हापासून त्यांच्या मनात एक आगळी कल्पना आकार घेत होती — पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या पवित्र पादुका लंडनमधील विठ्ठल मंदिरात प्रतिष्ठित करण्याची.
साध्या मार्गाने पादुका थेट विमानाने आणण्याऐवजी, खऱ्या वारकरी परंपरेनुसार एक जागतिक दिंडी काढण्याचा संकल्प त्यांनी केला. विविध देशांमधून, अनेक ऐतिहासिक आणि पवित्र स्थळांना भेटी देत, भक्तिभाव जागवणारी ही ‘पादुका वारी’ अखेर साकार झाली.
या आगळ्यावेगळ्या वारीचे नियोजन तब्बल सहा महिने सुरू होते. मार्ग, मुक्काम, कार्यक्रम, विविध देशांचे व्हिसा, वाहन परवाने, आर्थिक व्यवस्था, स्थानिक समुदायांशी संवाद, अशा अनेक गोष्टींची काळजीपूर्वक आखणी करण्यात आली. खेडकर व त्यांच्या टीमने मराठी मंडळे, इस्कॉन, अक्षरधाम अशा संस्थांचा आधार घेतला, आणि सर्वत्र भारतीय समुदायाचा अद्भुत प्रतिसाद अनुभवला.
१४ एप्रिल, सोमवार — पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पवित्र पादुकांचे पूजन झाल्यानंतर दिंडीचा प्रवास सुरू झाला. नागपूर, प्रयागराज अशा धार्मिक स्थळांतून ती पुढे नेपाळच्या लुंबिनी येथे पोहोचली — ही तीच जागा जिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला. चंद्रभागेच्या किनाऱ्यापासून ते त्रिवेणी संगमाच्या पावनतेपर्यंत आणि मग शांततेच्या प्रतीक असलेल्या बुद्धभूमीपर्यंत — ही यात्रा श्रद्धेचा आणि आत्मिक चिंतनाचा संगम बनत गेली.
नेपाळ-चीन सीमेलगत मात्र वारीला अडथळा जाणवला. चिनी अधिकाऱ्यांना दिंडीच्या वाहनावरील भारताच्या नकाशातील अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरचा भाग नापसंत होता. त्यांनी तो नकाशा काढून टाकण्याचा आग्रह धरला, आणि वारीने तडजोड करत मार्ग पुढे सुरू ठेवला.
हिमालयाच्या बर्फाच्छादित रांगा, तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदी, डुनहुआंगच्या गुहा आणि चीनमधील प्राचीन सिल्क रूटवरील तुरपान शहर — या सर्व ठिकाणी वारीने इतिहास, संस्कृती आणि श्रद्धेचा अनुभव दिला. मकाओ गुहांमधील बौद्ध चित्रकला व ध्यानधारणा पाहून भाविक भारावले. वारी पुढे काशगरमार्गे किर्गिस्तानमध्ये पोहोचली, जिथे स्थानिक मराठी विद्यार्थी भाविकांनी पादुकांचे दर्शन मोठ्या भक्तिभावाने घडवले. शिक्षणासाठी दूर गेलेली तरुण मंडळी विठ्ठल भक्तीत रमलेली पाहून, भक्तीच्या शक्तीचे वेगळेच दर्शन झाले.
मध्य आशियातील उझबेकिस्तानमध्ये वारी ताश्कंदमध्ये पोहोचली. भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला वंदन करून, दिंडीने इतिहासाशीही एक नातं जोडले. त्यानंतर वारी रशियात पोहोचली. एल्ब्रुस पर्वत — युरोप आणि रशियामधील सर्वात उंच शिखर — येथे पादुकांची प्रतिष्ठा झाली. डोंगररांगेच्या कुशीत भक्तिभावात चिंतन करणारा तो क्षण दिंडीच्या प्रवासातील एक शिखर ठरला.
जॉर्जियामधील तिबिलिसी शहरात, भारतीय समुदाय, विद्यार्थी आणि विविध देशांतील भाविकांनी “जय हरी विठ्ठल” च्या गजरात पादुकांचे स्वागत केले. त्यानंतर वारीने टर्की, सर्बिया, हंगेरी, चेक प्रजासत्ताक, जर्मनी, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, बेल्जियम आदी देशांतील विविध शहरांतून प्रवास करत २१ जून रोजी लंडनमध्ये प्रवेश केला.
लंडनमध्ये स्वागतासाठी मराठी कुटुंबे मोठ्या संख्येने एकत्र आली होती. पादुकांच्या पालखीला विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींसह सजवण्यात आले होते. परकर-पोलके, नववारी साड्या आणि पारंपरिक वेषभूषेत सादर केलेले स्वागत हे एक दृश्य महोत्सवच ठरले. लॅमिंग्टन मराठी मित्रमंडळाने कार्यक्रम उत्तमरित्या आयोजित केला होता. महिलांचा, लहान मुलांचा आणि युवकांचा भरघोस सहभाग होता.
ढोल-ताशाच्या गजरात रस्त्यांवरून निघालेली ही दिंडी, पुढे एका शाळेच्या मैदानात पोहोचली. तिथे रिंगणाचा कार्यक्रम झाला. महिलांनी फुगड्यांचा फेर धरला आणि भक्तिरसाने भारावलेले क्षण पंढरपूरच्या नातेपुते रिंगणाची आठवण करून देणारे होते. त्यानंतर शाळेच्या सभागृहात पादुका ठेवून अभंग, हरिपाठ, आरती आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी, पादुका पुढील मुक्कामासाठी ‘रग्बी’ शहराच्या दिशेने रवाना झाल्या.
या कार्यक्रमांमध्ये विविध देशांतील भाविकांनी तयार केलेला साबुदाणा खिचडी, शिरा, फळे आणि इतर प्रसाद, भक्तिभावाचे प्रतीक ठरले.
