दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’ पक्ष आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप आणि काँग्रेसमध्ये दिल्लीच्या निवडणूक रिंगणात कलगीतुरा रंगला असून दोन्ही बाजूने जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच, काँग्रेसचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन यांनी बुधवार, २२ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेतून अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेस नेते अजय माकन यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर ३८२ कोटी रुपयांचा आरोग्याशी संबंधित घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, १४ कॅग अहवालांपैकी एक अहवाल केजरीवाल यांनी केलेला आरोग्यविषयक घोटाळा दाखवून देत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणार या आधारावर त्यांचा पक्ष बनवला. त्यावेळी त्यांनी कॅगच्या अहवालांच्या आधारे काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आज अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणारे १४ कॅग अहवाल आहेत. एका अशा कॅगच्या अहवालात अरविंद केजरीवाल यांनी आरोग्याशी संबंधित ३८२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे, असे माकन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अजय माकन यांनी केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप करत दावा केला आहे की, तीन रुग्णालयांवर अतिरिक्त खर्च करण्यात आला असून हे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे, त्यामुळेच हे अहवाल सादर करण्यापासून रोखण्यात आले होते. कॅगच्या अहवालानुसार तीन रुग्णालयांवर निविदेपेक्षा ३८२.५२ कोटी रुपये जास्त खर्च झाले आहेत. यामुळेच अरविंद केजरीवाल यांनी कॅगचा अहवाल विधानसभेत मांडू दिला नाही. मी थेट आरोप करत आहे. त्यामुळेच कॅगचा अहवाल थांबवण्यात आला, असे माकन यांनी ठाम पणे सांगितले.
इंदिरा गांधी रुग्णालयाला पाच वर्षांचा विलंब झाला, बुरारी रुग्णालयाला सहा वर्षांचा विलंब झाला आणि मौलाना आझाद दंत रुग्णालयाला तीन वर्षांचा विलंब झाला. माकन पुढे म्हणाले की, दिल्लीतील इंदिरा गांधी रुग्णालयासाठी अतिरिक्त ३१४ कोटी रुपये खर्च करण्यात आले, त्यानंतर बुरारी रुग्णालयासाठी अतिरिक्त ४१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि मौलाना आझाद डेंटल हॉस्पिटलसाठी २६ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
हे ही वाचा..
९ नवे जिल्हे रद्द केल्याबद्दल राजस्थानमध्ये आंदोलन
दावोसमधून पहिल्याचं दिवशी सहा लाख कोटींहून अधिकची विक्रमी गुंतवणूक
बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित!
केरळचे पिनराई सरकार अडचणीत; पीपीई किट खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा!
कोविड काळात वैद्यकीय सुविधांअभावी लोक मरत असताना केंद्राने दिलेले ५६ टक्के अनुदान अखर्चित राहिले. २०१६-१७ ते २०२१-२२ पर्यंत चार वेगवेगळ्या अर्थसंकल्पात त्यांनी ३२,००० मेडिकल बेड्स बसवण्याची घोषणा केली होती, पण केवळ १,२३५ बेड्स बसवण्यात आले, असे माकन म्हणाले. राजीव गांधी आणि जनकपुरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची कमतरता ५० ते ७४ टक्के तर नर्सिंग स्टाफची संख्या ७३ ते ९६ टक्क्यांनी कमी असल्याचे माकन यांनी सांगितले.