32 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणकोंबड्याचे ‘कुकू च कू’, नी कश्मीरातील पहाट

कोंबड्याचे ‘कुकू च कू’, नी कश्मीरातील पहाट

Google News Follow

Related

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर कश्मीर खोरे तिरंग्याच्या रंगात रंगलेले जगाने पाहिले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर कश्मीर खोऱ्याचे हे परिवर्तन दिसू लागले आहे. हा बदल सूक्ष्म नसून ठसठशीत आहे.

जुलै २०१६ मध्ये हिजबुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कमांडर बुरहान वाणी याला सुरक्षा दलांनी ठोकले. त्याच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी झाली होती. बुरहानचे वडील मुजफ्फर अहमद वाणी यांनी यंदाच्या वर्षी कश्मीर खोऱ्यात तिरंगा फडकवला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने लोक जमले होते. अवघ्या पाच वर्षात झालेला हा बदल आहे.

हे एकमेव उदाहरण नाही, अशा उदाहरणांची जंत्री आहे. दहशतग्रस्त शोपियांमध्ये तिरंगा खरेदी करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. फुटीरवाद्यांच्या भारतविरोधी घोषणांनी दणाणून जाणारा श्रीनगरचा लाल चौक रोषणाईने उजळला होता. कश्मीरातील बर्फ आता वितळू लागले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवस आधी काश्मीरमध्ये ईद उत्साहात साजरी झाली. शोपियांमधील दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी जमातींनी स्वातंत्र्यांनंतर प्रथमच विजेच्या झगमगाटात ईद साजरी केली. दुर्गम गावांपर्यंत रस्ते पोहोचले, पाणी पोहोचले, त्यामुळे कश्मीरींच्या ईदच्या आनंदाला चार चाँद लागले.

शोपियांमधील नई बस्ती, मीर मोहल्ला, खरी मोहल्ला, डंगरपूरा या भागात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा वीज, पाणी, सडक या मूलभूत सुविधा मिळाल्या. श्रीनगरपासून अवघ्या ५० किमीवर असलेल्या शादाब खरेवा भागात ट्रान्स्फॉर्मर बसवण्यात आला. खोऱ्यात घडत असलेले हे स्थित्यंतर अभूतपूर्व आहे.

मोदी सरकारने कश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी सुविधांवर काम केले. त्याचा लाभ स्थानिक रहिवाशांना होतोय. कलम ३७० हटवल्यानंतर शेख आणि मुफ्ती कुटुंबाच्या कचाट्यातून कश्मीरी मोकळा श्वास घेतायत. लोकांना त्यांचे हक्क मिळू लागलेत. विकासाची उब त्यांना जाणवू लागली आहे. कश्मीर केंद्रशासित झाल्यापासून फुटीर राजकारण्यांची प्रशासनातील लुडबुड कमी झाली आणि कामाचा उरक प्रचंड वाढलाय.

काँग्रेसच्या राजवटीत काय होती काश्मीरची परिस्थिती? फाळणीनंतर कश्मीरमधून हिंदूंच्या पलायनाला सुरूवात झाली. मिळेल त्या किमतीला मालमत्ता विकून हिंदूंचे लोंढेच्या लोंढे बाहेर पडत होते. त्यांना आपल्या आयाबहिणींची अब्रू वाचवायची होती. जे थोडेबहुत धीर करून उरले होते त्यांना १९ जानेवारी १९९० रोजी मशिदीच्या लाऊडस्पीकरवरून खोरे सोडण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. उरल्यासुरल्या हिंदूंना नेसत्या वस्त्रांनिशी हाकलण्यात आले.

पाकिस्तानवाद्यांचा उन्माद काँग्रेसच्या राजवटीत असा चढत्याक्रमाने वाढत होता. स्वातंत्र्यदिनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा जाळण्याचे जाहीर कार्यक्रम होते होते.

‘नारा ए तकबीर, अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत दर स्वातंत्र्यदिनाला, प्रजासत्ताक दिनाला तिरंगा जाळण्यात यायचा. या ‘सोहळ्या’साठी हजारोंच्या झुंडी जमवल्या जायच्या. त्या जिहादी जमावाचा भारतविरोधी उन्माद, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा हा तमाशा रक्त उसळवणारा असायचा. दरवर्षी हा तमाशा पाहणे, मुठी आवळून माना खाली घालणे एवढेच आपल्या हाती होते. गेली काही वर्षे तोच लाल चौक रोषणाईने उजळतो आहे. रविवारीही तिरंगा तिथे डौलाने फडकत होता.

‘दहशतवादाशी समझौता नाही’, हे धोरण मोदी सरकारने स्वीकारले आणि कठोरपणे राबवलेही. उरीतील सर्जिकल स्ट्राईक आणि बालकोट येथील एअर स्ट्राईकही मोदी सरकारच्या धोरणाची दोन ठसठशीत उदाहरणे.

मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचे एन्काऊंटर झाले. मे २०१८ ते जून २०२१ या तीन वर्षांच्या काळात ६३० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दहशतवादी संघटनांना दर दोन दिवसांनी नवा कमांडर घोषित करावा लागतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षात पहिल्यांदा काश्मीरमध्ये स्वातंत्र्यादिनी फोन आणि इंटरनेट सुविधांवर कोणतेही निर्बंध नव्हते. शांळाशाळांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा झाला. मुलांनी खड्या आवाजात ‘जन जण मन…’ गायले. स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वच्छता केली. झाडे लावली. खोऱ्यातील धरणांवरही तिरंग्याची रोषणाई करण्यात आली होती. एका नव्या भारताचे दर्शन कश्मीरात घडले.. हे मोदीनीतीचे परिणाम आहेत.

मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीशी युती करणे ही भाजपाची रणनीती होती. सत्तेत शिरकाव करून जम्मू कश्मीरच्या अंतरंगात डोकावण्याचा तो प्रयत्न होता. परंतु ही युती केल्यानंतर भाजपाने ना राम मंदीराच्या मुद्यावर घुमजाव केले, ना कलम ३७० बाबत आपली नीती बदलली. मुफ्ती यांच्याशी आघाडी करणाऱ्या भाजपाला कधी टिपू जयंती साजरी करावीशी वाटली नाही, की अजान स्पर्धा आयोजित करण्याचा मोह झाला. सत्तेच्या राजकारणात नीतीमूल्य सोडली की राजकीय नेते कंबरेचे सोडून डोक्याला बांधायलाही तयार होतात. ज्यांच्यावर कधी जहरी टीका केली, त्यांचे जोडे उचलायलाही तयार होतात. भाजपाने कश्मीरमध्ये मुफ्तीसोबत जाताना यातले काहीही केले नाही. वेळ आल्यानतंर देशविरोधी कारवायांसाठी मेहबुबांना नजरकैदेत ठेवून जागा दाखवली.

हे ही वाचा:

मेघालयात ‘या’ कारणासाठी गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा

राशीद खानचं कुटुंब संकटात?

‘या’ विमा कंपनीचे होणार खासगीकरण

अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्र सैन्य पाठवणार?

१९८९ पासून कश्मीरमध्ये प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला, प्रजासत्ताक दिनाला ब्लॅक आऊट, शट डाऊनच्या घोषणा करणाऱ्या दहशतवादी संघटना यंदा शांत होत्या.

फाळणी आणि कश्मीरच्या भळभळत्या जखमांचा अभिन्न संबंध आहे. काँग्रेसने देशाची फाळणी केली. पंडित नेहरुंच्या कार्यकाळात आणि त्यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात कश्मीरच्या जखमा अधिक चिघळल्या. हा भूभाग भारतात राहतोय की जातोय अशी चिंता निर्माण व्हावी असा एक काळ होता. कट्टरवाद्यांच्या दाढ्या कुरवाळणाऱ्या काँग्रेसचा देशाच्या सत्तेवरून कडेलोट झाल्यानंतर कश्मीरच्या जखमा भरू लागल्या.

पंतप्रधान मोदींनी १४ ऑगस्ट हा ‘फाळणी वेदना दिवस’ म्हणून जाहीर केला. देशाची फाळणी एक दिवसात झालेली नव्हती. काँग्रेसच्या तुष्टीकरण आणि बोटचेप्या धोरणांचा परिपाक म्हणून १९४७ साली देश विभाजित झाला. देश जेव्हा जेव्हा तुष्टीकरणाच्या मार्गाने जाईल तेव्हा तेव्हा खंडित होईल या धड्याची दरवर्षी १४ ऑगस्टला देश म्हणून आपण उजळणी करावी हा मोदींचा हेतू असावा.

‘फाळणी वेदना दिवस’ जाहीर केल्यामुळे शिवसेनेला प्रचंड वेदना झाल्या आहेत. ‘आग कशी विझणार? फाळणीचा स्मृतीदिन…’ हा अग्रलेख पाडून शिवसेनेने ज्ञान पाजळलेले आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाला हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव यातला फरक समजत नसला तरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सल्ले देण्याचा त्यांचा सोस काही कमी होत नाही. देश खंडित करणाऱ्या, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात १०६ हुतात्म्यांचा बळी घेणाऱ्या काँग्रेससोबत चुंबाचुंबी करणाऱ्या शिवसेनेला सत्ता टिकवण्यासाठी, राहुल गांधींची मर्जी राखण्यासाठी मोदींवर टीका करणे भाग आहे. कश्मीरातील बदलांचे कौतुक करणे शिवसेनेला परवडणार नाही. स्वातंत्र्याचा सूर्य आता कश्मीरमध्येही तळपू लागला आहे. हा प्रकाश इतका स्वच्छ आणि प्रखर आहे की, कोंबडा आरवला नाही तरी तो लोकांना दिसणारच आहे. त्याला कोणाच्या साक्षीची गरज नाही. देश काँग्रेसने लादलेल्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडतो आहे. स्वत्वाचे भान आपल्यामुळे पुन्हा तेजाने तळपतो आहे. मुठभर सत्तालोलुप काय म्हणतात, यामुळे हे परिवर्तन थांबणार नाही. तुष्टीकरणाच्या दुर्धर व्याधीतून देशाची सुटका करणाऱ्या आणि कश्मीरला पूर्वपदावर आणणाऱ्या पंतप्रधान मोदींना मनापासून सदिच्छा, त्यांना अधिक बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा