कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) आंदोलनानंतर आणि त्यातून घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर अभिजीत दिपके पुन्हा आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी परतल्यानंतर कुटुंबात दिलास्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांच्या चिंतेनंतर मुलगा सुखरूप परतल्याने दिपके कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून आला. मात्र, या आनंदासोबतच त्याच्या आई-वडिलांनी एक महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचा मुलगा राजकारणापासून दूर राहावा आणि स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे, अशी त्यांची ठाम इच्छा आहे.
अभिजीतची आई अनिता दिपके यांनी मुलाच्या सुरक्षित परतीला सर्वात मोठा विजय असल्याचे सांगितले. गेल्या काही आठवड्यांपासून संपूर्ण कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली होते. मुलाबाबत सातत्याने येणाऱ्या बातम्या, त्याच्याविरोधातील कारवाईची शक्यता आणि आंदोलनामुळे निर्माण झालेले वातावरण यामुळे घरच्यांची झोप आणि भूक दोन्ही हरपली होती. त्यामुळे तो सुखरूप घरी परतल्यानेच सर्वात मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत व्यक्त केले.
हे ही वाचा:
बेंगळुरूत झुकलेली १८ मजली इमारत पाडणार… प्रत्येक फ्लॅटची किंमत दीड कोटी
गोव्यात ‘फ्री उमर खालिद’ फलक दाखवणारा ताब्यात
चीनच्या विक्रमी सोनेखरेदीने बदललं जागतिक बाजाराचं गणित
अंमली पदार्थ आता ‘कुरियर’ करण्याचा घाट, न्यूझीलंडला जाणारे ड्रग्स पकडले
अभिजीतचे वडील भगवानराव दिपके यांनी मात्र अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. “माझा मुलगा पुन्हा कधीही राजकारणात जाणार नाही,” असे ते ठामपणे म्हणाले. प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेची चिंता अधिक वाढल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात सध्या असलेले तणावपूर्ण वातावरण पाहता मुलाने या क्षेत्रापासून दूर राहावे, अशी त्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, समाजासाठी काम करण्याचे अनेक मार्ग आहेत; मात्र सक्रिय राजकारण हा त्यापैकी योग्य मार्ग नाही.
दिपके कुटुंबाने सांगितले की, अभिजीतने कॉकरोच जनता पक्षाची स्थापना केल्याची माहिती त्यांना सुरुवातीला नव्हती. शेजारी आणि नातेवाईकांकडून त्याबाबत समजले. त्यानंतर सोशल मीडियावर या पक्षाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि अभिजीतची वाढती लोकप्रियता पाहून त्यांची चिंता आणखी वाढली. मुलाच्या लोकप्रियतेपेक्षा त्याची सुरक्षितता त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.
दरम्यान, अभिजीत दिपकेच्या घरी त्याच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने समर्थक आणि स्थानिक नागरिक जमले होते. घोषणाबाजी, जल्लोष आणि अभिनंदनाचा वर्षाव होत असताना कुटुंबीयांनी मात्र हा क्षण मुलाच्या सुरक्षित परतीचा असल्याचे सांगत संयमाची भूमिका घेतली. त्यांच्या मते, हा कोणत्याही राजकीय विजयाचा नव्हे, तर कुटुंब पुन्हा एकत्र आल्याचा आनंद आहे.







