दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या भरघोस यशानंतर तब्बल २७ वर्षांनंतर भाजपाने राजधानीत सत्ता स्थापन केली आहे. बहुमत मिळाल्यानंतर अनेक दिवस भाजपाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी बसणाऱ्या व्यक्तीचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. अखेर बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी भाजपाने रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यानंतर गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
दिल्लीतील रामलीला मैदानात रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याची जागा ठरताच या मैदानावरील पूर्वीच्या घटनांची चर्चा सुरू झाली होती. दिल्लीच्या याच मैदानावर अण्णा हजारे यांचे आंदोलन झाले आणि त्यातून अरविंद केजरीवाल हे प्रथम सगळ्यांसमोर आले. तिथून त्यांनी राजकीय पक्ष काढला आणि सतेत्तही बसले. मात्र २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव झाला.
उप राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांच्या रूपाने भाजपाने दिल्लीला महिला मुख्यमंत्री दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर १२ दिवसांनी दिल्लीला नव्या मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. शालीमार बाग (वायव्य) मतदारसंघातून रेखा गुप्ता या ६८,२०० मतांनी विजयी झाल्या होत्या. रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच त्या सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांच्यानंतर दिल्लीत पदभार स्वीकारणाऱ्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. दिल्लीत पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, इतर केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नेते उपस्थित होते. यावेळी हजारोंच्या संख्येने भाजपा कार्यकर्तेही उपस्थित होते.
रेखा गुप्ता यांनी दिल्लीतील भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस आणि त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या सदस्या म्हणून काम केले आहे. या भूमिकांमध्ये, त्यांनी उपेक्षित समुदाय आणि महिलांच्या कल्याणासाठी अनेक मोहिमा सुरू केल्या आहेत. रेखा गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष नेतृत्वाचे त्यांच्यात स्थान दिल्याबद्दल आभार मानले तसेच अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
हे ही वाचा..
विजेंदर गुप्ता विधानसभेचे नवे अध्यक्ष होणार
महाकुंभ: महिलांच्या स्नानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, पोलिसांकडून गुन्हा दाखल!
‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आंदोलन
बांगलादेशी घुसखोरांविरोधात हिंदू जनजागृती समितीकडून दादरमध्ये मूक निदर्शन
सहा भाजपा नेत्यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ
रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यात आणखी सहा भाजपा नेत्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. उप राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी त्यांना शपथ दिली. परवेश साहिब सिंग, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रविंदर इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि डॉ. पंकज कुमार सिंग यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.