काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांच्या काश्मीर दौऱ्यामुळे त्यांच्या पक्षात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन तेथील परिस्थितीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर काँग्रेसच्या जम्मू- काश्मीर युनिटनेच त्यांच्यावर टीका केली आहे. स्थानिक जनतेची आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट न घेतल्याने थरूर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
नालंदा संवाद कार्यक्रमासाठी श्रीनगरमध्ये आलेल्या थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती दिली. जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य स्थितीकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगत त्यांनी परिस्थितीबाबत आशावाद व्यक्त केला.
थरूर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “नायब राज्यपालांसोबत जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि सामान्य स्थितीकडे होत असलेल्या उत्साहवर्धक प्रगतीबाबत चर्चा झाली. मी पोहोचलो तेव्हा ते काश्मिरी लेखक संघटना आणि महिला संघटनेच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. हा सकारात्मक संवाद पाहून मला आनंद झाला. अजूनही अनेक आव्हाने आहेत, मात्र बैठकीनंतर मी पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक झालो.”
थरूर यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीने (जेकेपीसीसी) नाराजी व्यक्त केली. पक्षाचे प्रवक्ते रवींद्र शर्मा यांनी थेट थरूर यांच्या पोस्टलाच उत्तर देत त्यांच्यावर टीका केली. “काश्मीरच्या जनतेलाही तुम्ही भेटावे अशी अपेक्षा होती. राज्याचा दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी सात वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी तुम्ही थोडा वेळ तरी काढायला हवा होता,” असे शर्मा यांनी म्हटले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे थरूर आणि काँग्रेस नेतृत्वातील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत.
काश्मीर दौऱ्यावरील हा वाद शमण्याआधीच थरूर यांचे आणखी एक वक्तव्य चर्चेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत भारतीय नागरी खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता, असे थरूर यांनी म्हटले होते. या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. पक्षाच्या काही नेत्यांनी थरूर यांच्यावर मोदींची “प्रशंसा” केल्याचा आरोप केला. काँग्रेसचे माध्यम आणि प्रसिद्धी विभाग प्रमुख पवन खेरा यांनीही थरूर यांच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत, मोदी-ट्रम्प चर्चेबाबत अशा प्रकारचा उल्लेख अधिकृत नोंदींमध्ये आढळत नसल्याचे म्हटले.
टीकेला उत्तर देताना थरूर यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. भारतीय नागरी खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा युद्धकाळात अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी आपले वक्तव्य योग्य असल्याचा दावा केला. थरूर यांनी मोदी-ट्रम्प बैठकीसंदर्भातील वृत्तांचे संदर्भ देतानाच गुगलच्या जेमिनी एआय टूलमधील एका सारांशाचाही उल्लेख केला. ओमानच्या आखातात अमेरिकन कारवाईत तीन भारतीय खलाशी ठार झाल्याच्या घटनेबाबत आपण केलेला उल्लेख तथ्यांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. “मी मोठ्या प्रमाणात वाचन करतो आणि वाचलेले लक्षात ठेवतो. माझ्यावर कधीही तथ्यांचा विपर्यास केल्याचा आरोप झालेला नाही. मी जे विधान केले, ते उपलब्ध अहवालांवर आधारित होते,” असे थरूर म्हणाले.
हे ही वाचा:
कतारच्या रास लाफान एलएनजी प्रकल्पात भीषण स्फोट; ५४ जखमी
पाणी अडवल्यास युद्ध! पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची भारताला धमकी
अमेरिका-इराण ६० दिवसांच्या शांतता आराखड्यावर सहमत
वाराणशीतील मशिदीबाबत पाकिस्तानला कळवळा, भारताने सुनावले
अमेरिका-इराण संघर्षात प्राण गमावलेल्या भारतीयांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी काँग्रेस राजकीय फायद्याच्या गणितात अधिक गुंतली असल्याचा आरोपही थरूर यांनी केला. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद आणखी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर थरूर यांनी घेतलेल्या स्वतंत्र भूमिकेमुळे त्यांचे आणि काँग्रेस नेतृत्वाचे सूर वारंवार विसंगत दिसत आहेत. काश्मीर दौऱ्यानंतर निर्माण झालेला हा नवा वाद पक्षातील अंतर्गत संघर्ष अधिकच अधोरेखित करणारा मानला जात आहे.







