छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. भूपेश बघेल यांनी दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला हे अधोरेखित करत ही कारवाई यशस्वी झाली का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
भूपेश बघेल यांनी चुकीची जबाबदारी घेण्याची मागणी केली असून जीवितहानी रोखण्यात अपयश आल्यास कोण जबाबदार आहे असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यात सहभागी दहशतवाद्यांना पकडण्यात किंवा निष्क्रिय करण्यात अपयश आल्याचे कारण त्यांनी यावेळी दिले. “२६ जणांनी आपले प्राण गमावले, ते ४-५ दहशतवादी पकडले गेले का? जर ते पकडले गेले नाहीत, तर ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले असे तुम्ही कसे म्हणू शकता? या चुकीला कोण जबाबदार आहे?,” असा प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
पुढे भूपेश बघेल यांनी काश्मीरमध्ये सर्व काही सामान्य आहे या सरकारच्या आश्वासनावर त्यांनी टीका केली, ज्यामुळे लोक त्यांच्या कुटुंबासह या प्रदेशात येऊ लागले आणि त्यामुळे त्यांच्या प्रियजनांचे नुकसान झाले. “सर्व काही सामान्य आहे या सरकारच्या आश्वासनावरून लोक काश्मीरला गेले होते. लोक त्यांच्या कुटुंबियांसह तिथे गेले आणि त्यांनी त्यांचे प्रियजन गमावले,” असे ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा..
नक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटात जवान जखमी
पहलगामनंतर दहशतवाद्यांच्या पापांचा घडा भरला!
अमेरिका, चीनमधील टॅरिफ वॉर ९० दिवसांसाठी स्थगित
कोहलीच्या टेस्ट संन्यासावर क्रिकेटविश्व भावूक
दरम्यान, २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि हिजबुल मुजाहिदीनच्या प्रमुख ऑपरेशनल केंद्रांना लक्ष्य करून उध्वस्त करण्यात आले. याला पाकिस्तान सैन्याने प्रत्युत्तर म्हणून भारताच्या लष्करी ठिकाणांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व हल्ले भारताने हाणून पाडले. अखेर शनिवारी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा करार झाला. अजूनही यावर चर्चा सुरू आहे.
