पाकिस्तानकडून पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाबद्दल भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सरकारने सत्ताधारी आणि विरोधकांच्या खासदारांचा गट इतर देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सर्व राजकीय पक्षांकडून खासदारांची नावे मागवण्यात आली होती. दरम्यान, कॉंग्रेसने सुचवलेल्या चार खासदारांचा विचार न करत केंद्र सरकारने कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना संधी दिली आहे. यानंतर कॉंग्रेसने सरकारवर टीका केली आहे. हा सरकारचा अप्रामाणिकपणा असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
सरकारने काँग्रेस नेते शशी थरूर यांचे नाव सात खासदारांच्या यादीत समाविष्ट केल्यानंतर कॉंग्रेसकडून टीका केली जात आहे. “आम्हाला नावे विचारण्यात आली होती. अपेक्षा होती की आम्ही दिलेली नावे समाविष्ट केली जातील. पण जेव्हा पीआयबीचे प्रेस रिलीज पाहिले तेव्हा आश्चर्य वाटले. आता काय होईल हे मी सांगू शकत नाही. चार नावे विचारणे, चार नावे देणे आणि दुसरे नाव जाहीर करणे हे सरकारकडून अप्रामाणिक आहे,” असे कॉंग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले. पुढे ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाने प्रत्येक गोष्टीत पाठिंबा दिला, परंतु जेव्हा नावे जाहीर करण्यात आली तेव्हा पक्षाला आश्चर्य वाटले आहे.
जयराम रमेश म्हणाले की, “२२ एप्रिलपासून आतापर्यंत आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी करत होतो, दोन बैठका झाल्या पण ती औपचारिकता होती, पंतप्रधान आले नाहीत. लोकसभा आणि राज्यसभेच्या विरोधी पक्षनेत्यांनी विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी पत्र लिहिले, सविस्तर चर्चा व्हावी असा उद्देश होता, पंतप्रधानांनी यावर कोणतेही उत्तर दिले नाही. आता अचानक कळले की सर्वपक्षीय शिष्टमंडळ विदेशात जाणार आहे, या निर्णयाचेही स्वागतही केले. खासदारांची नावे मागितली गेली आणि आज स्वतःच ती जाहीर केली, ही प्रामाणिकता आहे,” असा आरोप जयराम रमेश यांनी केला.
हेही वाचा..
खोटं बोलणं शाहबाज शरीफ यांची मजबूरी
चप्पलमधून सापडले ३.८६ कोटींचे सोनं
रश्दी यांच्या डोळ्यावर चाकूने हल्ला करणाऱ्याला २५ वर्षांची शिक्षा
शशी थरूर, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांनी मोदींचे मानले आभार!
दरम्यान, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शशी थरूर यांचे नाव सात खासदारांच्या यादीत समाविष्ट केले आहे. हे खासदार जागतिक व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करणार असून तिथे ते ऑपरेशन सिंदूरबद्दल जागतिक नेत्यांना माहिती देतील. शशी थरूर यांनी सरकारचा प्रस्ताव देखील स्वीकारला आहे.
