राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो जनतेसमोर आल्यावर आणि एकूणच राज्यभरात संतापाची लाट उसळल्यानंतर अखेर मंगळवारी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र यांनी भाष्य करत स्पष्ट मत मांडले आहे. ‘टीव्ही ९’ च्या मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
धनंजय मुंडेंचा राजीनामा यायला इतका वेळ का लागला? यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांना यंत्रणा समजत नाही. ज्यावेळी ही घटना घडली. त्यानंतर सीआयडीची चौकशी लावण्यात आली. तसेच तपासात कोणाचा हस्तक्षेप नसेल असे आश्वासन देण्यात आले. फॉरेन्सिक टीमने हरवलेले मोबाईल शोधून संपूर्ण डेटा दिला. त्यामुळे फोटोही समोर आले. ते फोटो कोणी शोधले नाही, तर चार्जशीटमधील आहे. सीआयडीच्या कामात कुणीही हस्तक्षेप केला नसून ज्या दिवशी चार्जशीट दाखल झाली त्यावेळीचं कळलं की तपास काय आहे. तोपर्यंत एकदाही सीआयडीकडे माहिती मागितली नाही. फोटोही पाहिले नव्हते. चार्जशीट दाखल झाल्यावरच मी फोटो पाहिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे फडणवीस म्हणाले की, मुंडे यांचा राजीनामा योग्य वेळी झाला की चुकीच्या वेळी झाला या चर्चेवर बोलणार नाही. राजकारणात पहिल्या दिवशी राजीनामा झाला किंवा शेवटच्या दिवशी, लोकं बोलणारच. फोटो समोर आले. ज्या प्रकारे हत्या झाली आणि हत्येचा मास्टरमाइंड ज्याला म्हटलं गेलं तो मंत्र्यांच्या इतक्या जवळचा आहे तर मंत्र्याने नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे. आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे निर्णय घ्यायला उशीर झाला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रॉसिक्युशनच्या नियमानुसार प्रॉसिक्युशन लॉयर चार्जशीटमध्ये असिस्ट करू शकत नाही. त्यामुळे ज्या दिवशी चार्जशीट दाखल झाली, त्याच दिवशी आम्ही वकील नियुक्त करू शकतो. प्रॉसिक्युशन लॉयरने चार्जशीटमध्ये हस्तक्षेप केला असेल तर टेक्निकली ही केस होत नाही, असा न्यायालयाचा निर्णय आहे. हे लोकांना कळत नाही. लोक आमच्यावर आरोप करतात. यांची नियुक्ती का केली नाही, त्यांची उशिरा नियुक्ती का केली? असे सवाल विचारले जातात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण यातील आरोपी सारखेच आहेत. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीची बैठक झाली, असा आरोप होत असताना त्यांची चौकशी का होत नाही? यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्राने नवीन कायदे बनवले असून भारतीय न्याय संहितेत स्पष्टपणे म्हटलं आहे की, खंडणीचा गुन्हा झाल्यानंतर त्यातून दुसरा गुन्हा होत असेल तर दोन्ही घटनांना लिंक करुन खंडणीच्या गुन्ह्याला गंभीरतेने घेतलं जाईल आणि त्याला मास्टरमाईंड म्हणता येईल. हा कायदा आल्यापासून ही पहिलीच केस आहे. सीआयडीकडे एकजरी पुरावा असेल की, धनंजय मुंडेंच्या घरी बैठक झाली किंवा ते डायरेक्ट सहभागी आहेत किंवा त्यांनी दबाव टाकलाय तर कारवाई झाली असती. परंतु, माहितीनुसार अशी कोणतीही गोष्ट घडलेली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा :
अबू आझमींसोबतचे उद्धव ठाकरेंचे छायाचित्र शेअर करत भातखळकरांनी काढला चिमटा
सोनप्रयागहून केदारनाथ ३६ मिनिटांत गाठता येणार; रोपवे प्रकल्पाला मंजुरी
भारताविरुद्ध किमान २८० धावा करायला हव्या होत्या!
अबू आझमींना उत्तर प्रदेशात पाठवा, आम्ही त्यांच्यावर उपचार करू!
औरंगजेब कधीही कुणाचा हिरो होऊ शकत नाही
सपा खासदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्यानंतर त्यांचे संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अबू आझमी यांनी केलेले वक्तव्य हे जाणूनबुजून केले असून त्यांच्या वोट बँकेतील रॅडिकल एलिमेंटला ते संदेश देऊ पाहत आहेत. औरंगजेबाने मंदिरे लुटली, हिंदुंवर कर लावले, महिलांचा छळ केला, संभाजी महाराजांना छळ करून मारले हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे औरंगजेब कधीच कोणाचा हिरो होऊ शकत नाही. अबू आझमी यांच्यावर लोकशाही पद्धतीने जो इलाज करायचा तो केला आहे. आता पुढचा इलाज करायचा असेल तर तो चॅनलवर थोडीच सांगणार, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला आहे.







