उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या बातम्या सतत माध्यमात दाखवल्या जातात, यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ‘लोकसत्ता’च्या वर्षवेध कार्यक्रमात संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की, एकनाथ शिंदे हे नाराज आहेत किंवा हे नाराजी नाट्य ही माध्यमांची निर्मिती असते का? यावर देवेंद्र फडणवीस यांनी उदाहरणासह उत्तर देत या चर्चांमागील सत्यता स्पष्ट केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “काल आमची एक बैठक होती. बैठकीपूर्वी एकनाथ शिंदेंचा फोन आला आणि त्यांनी म्हटले की, त्यांच्या पत्नीच्या काही वैद्यकीय चाचण्या करायच्या आहेत. बैठकीला पोहचण्यास उशीर होईल त्यापेक्षा बैठकीला येत नाही चालेल का? म्हटलं चालेल. त्यामुळे ते आले नाहीत. एकनाथ शिंदे हे बैठकीला अनुपस्थित राहताच लगेच बातम्या आल्या की, एकनाथ शिंदे नाराज,” अशी एक घटना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “एकनाथ शिंदेंचा चेहरा हा गंभीर असतो. ९० टक्के त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांचा चेहरा गंभीरचं दिसतो. आधी मुख्यमंत्री असतानाही त्यांचा चेहरा गंभीर होता आणि आताही त्यांचा चेहरा गंभीरचं आहे. त्यांचे तेच तेच फोटो दाखवून माध्यमांमध्ये सांगितलं जातं की, ते हसत नाहीत, नाराज आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदेंना सांगावे लागेल की चेहऱ्यावर हसण्याचे काही लावून घ्या, असा गमतीदार सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येकाची आपली कार्यपद्धती असते. तसेच प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळं असतं. याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांचे धीरगंभीर व्यक्तिमत्व आहे.
हे ही वाचा..
द्वारका जिल्ह्यातील बेकायदेशीर अतिक्रमण पाडण्याविरोधातील याचिका फेटाळली
ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक प्रकरणात आरोपींचा जामीन फेटाळला
अनधिकृत भारतीयांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान आज अमृतसरमध्ये उतरणार
मादी चित्ता ‘वीरा’ने दोन बछड्यांना दिला जन्म, संख्या २६ वर पोहोचली!
पुढे देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आले की, तीन पक्षांचे सरकार असून यातील एक पक्ष भावनिक भागीदार आणि दुसरा पक्ष व्यावहारिक भागीदार आहे. तर, प्रेम आणि व्यवहार यात गडबड होते का? यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अशी काही गडबड होत नाही. सोबतच्या दोन्ही नेत्यांनी अनेक वर्षे राजकारण पाहिले आहे शिवाय वर्षानुवर्षे सरकारमध्ये काम केले आहे. दोन्ही नेत्यांना सरकारच्या क्षमता आणि मर्यादा ठाऊक आहेत. त्याच्याही पलीकडे समजूतदारपणा असतो. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी दीर्घकाळ काम केले आहे. एकमेकांचे स्वभाव आम्हाला माहित आहेत. त्यामुळेचं समतोल साधण्यात फार अडचणी आहेत असे वाटत नाही.”