काँग्रेस खासदार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दक्षिण कोलकाता येथील भवानीपूर पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
२३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना वादग्रस्त पोस्ट केल्याबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींच्या पोस्टमध्ये नेताजींच्या मृत्यूची तारीख नमूद केल्याने हा वाद निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी गट अखिल भारतीय हिंदू महासभेने ही तक्रार दाखल केली आहे. दक्षिण कोलकाता येथील एल्गिन रोडवरील नेताजींच्या वडिलोपार्जित घराजवळही या गटाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आणि राहुल गांधींनी केलेल्या वादग्रस्त पोस्टच्या मजकुराचा निषेध नोंदवला.
अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी म्हणाले की, राहुल गांधी तोच वारसा पुढे चालवत आहेत ज्यामुळे नेताजींना आधी काँग्रेस सोडण्यास आणि नंतर देश सोडण्यास भाग पाडले होते. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नेहमीच नेताजींच्या आठवणी भारतातील लोकांच्या स्मरणातून पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आणि यावेळीही त्यांनी नेताजींबद्दल चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी भारतीय जनता त्यांना शिक्षा देईल.
हे ही वाचा :
बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न कणखरपणे हाताळला जाईल?
…आता अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांत १० टक्के आरक्षण!
बांगलादेशला देण्यात येणारा निधी अमेरिकेने स्थगित केला
खासदार राहुल गांधी यांनी फेसबुकवर एका पोस्टमध्ये नेताजींच्या मृत्यूची तारीख १८ ऑगस्ट १९४५ दिली असून याच तारखेला नेताजींचे विमान तायहोकू (आताचे तैपेईमध्ये) कोसळले होते. मात्र, नेताजींच्या मृत्यूची नेमकी तारीख कधीच निश्चित होऊ शकली नाही आणि त्यांच्या बेपत्ता झाल्यानंतर स्थापन झालेल्या आयोगांनीही याची पुष्टी केली नाही.