छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची कहाणी सांगणारा चित्रपट ‘छावा’ हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीचा हा सिनेमा वादाच्या विळख्यात सापडला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसादही मिळाला. मात्र, या ट्रेलरमधील एका दृश्यावरून आक्षेप नोंदवण्यात येत आहे. तसेच हे दृश्य सिनेमातून काढून टाकण्याची मागणी केली जात आहे.
चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज हे लेझीम खेळत नृत्य करताना दिसत असल्याबद्दल आक्षेप घेतला जात आहे. काही संघटनांनी याविरोधात आंदोलनही सुरू केले होते. यानंतर आता चित्रपटातील वादग्रस्त भाग काढून टाकल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले की, नृत्य दाखवल्यावरून झालेला वाद आता थांबला असेल. मी स्वतः चित्रपटाच्या दिग्दर्शकांना फोन केला होता. त्यानंतर घडलेली सकारात्मक गोष्ट म्हणजे चित्रपटातील नाचण्याचा भाग त्यांनी काढून टाकला आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
“धर्मरक्षक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणं ही आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मतं व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने याबाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे,” असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आता चित्रपटातील वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला आहे.
हे ही वाचा :
सुभाषचंद्र बोस यांच्यावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या राहुल गांधींवर एफआयआर दाखल
अखंड भारताच्या जागरणाचे व्यासपीठ झाले २५ वर्षांचे!
परशुराम हिंदू सेवा संघाच्या पुणे महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी अमृता देवगावकर
बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न कणखरपणे हाताळला जाईल?
‘छावा’ या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.