– संजय ढवळीकर
भारतमध्ये आपण सर्वजण १५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्रदिन साजरा करतो. परंतु १५ ऑगस्ट च्या आदल्या दिवशी म्हणजेच १४ ऑगस्ट ला फाळणी झाली. या विभाजन तथा फाळणी दिनाची खंत, शल्य, सल, बोच आणि दुःखद किनार सतत समाज मनात आहे. ही ज्योत समाज मनामध्ये सतत तेवत रहावी या उद्देशाने अखंड भारत व्यासपीठची सुरुवात झाली.
खरंतर अखंड भारत व्यासपीठाची मुहूर्तमेढ प्राथमिक स्वरूपात १९८५ साली झाली. सुरुवातीच्या काळात प्रथमतः अखंड भारत दिन पाळणे हाच एकमेव मुख्य कार्यक्रम धरून याची सुरुवात झाली. परंतु, पुढे या व्यासपीठाची दृष्टी आणि उद्देश व्यापक होत गेला आणि १९९९ ला मूर्तस्वरुपात अखंड भारत व्यासपीठाची गुढी रोवली गेली. आज याला २५ वर्ष पूर्ण होत आहेत.
प्रथमतः दरवर्षी अखंड भारत या विषयाला अनुसरून एक व्याख्यान असा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून सतत १९ ते २० वर्षे ही व्याख्यानमाला सुरू राहिली. या व्याख्यानमालेत नानाराव ढोबळे, शिवराय तेलंग, सु ग शेवडे, ब ना जोग, सुरेशराव केतकर, दादा इदाते, वसंतराव केळकर, डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी, सुरेंद्र थत्ते, प्रलहादजी अभ्यंकर, दुर्गानंद नाडकर्णी, डॉ. अशोकराव मोडक, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, मुझ्झफर हुसेन, सुहासराव हिरेमठ, अरुण करमरकर, शरदराव हेबाळकर, पू. सुदर्शनजी आणि पू. आचार्य धर्मेंद्रजी अशा महनीय व्यक्तींनी आपले विचार मांडले आहेत.
या व्यासपीठाचे कार्य आणि एकूणच ध्यास बघून आचार्य धर्मेन्द्रजींनी ह्या संस्थेचे नाव “अखंड भारत व्यासपीठ” असेच असेल असे त्यांच्या व्याख्यानात घोषितच केले. एक प्रकारे त्यांचा या कार्यासाठी असलेला हा एक मोठा आशीर्वादच मानावा लागेल. या व्यासपीठाचे प्रथम अध्यक्ष म्हणून स्वर्गीय मुझ्झफर हुसेन यांनी जबाबदारी स्वीकारली आणि या कामामध्ये एक प्रकारचे सातत्य आणि कार्यविस्ताराच्या दृष्टीने खूप प्रयत्न केले.
पुढील काळात म्हणजेच २००४ पासून दरवर्षी स्वातंत्रदिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी विविध सार्वजनिक संस्थांमध्ये झेंडावंदन कार्यक्रमामध्ये वक्ता म्हणून अखंड भारत व्यासपीठाचे कार्यकर्ते जाऊ लागले आणि अखंड भारताविषयी विविध विषय मांडू लागले. साधारणपणे २०१० पासून दरवर्षी या विषयाला अनुसरून एक दिवसीय अभ्यासवर्ग घेण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत सातत्याने हा एक दिवसीय अभ्यासवर्ग होत आहे.
या अभ्यासवर्गामध्ये आतापर्यंत डॉ. सचिदानंद शेवडे, शेषाद्री चारी, दिलीप करंबेळकर, जनरल शेकटकर, शरदभाऊ जोशी, रमेश पतंगे, मल्हार गोखले, रतन शारदा, इंद्रेश कुमार जी, पांडुरंग बलकवडे, डॉ. सतीश मोढ आदींनी आपले विचार मांडले आहेत.
या व्यतिरिक्त अखंड भारत प्रदर्शनी, अखंड भारत ज्योत, अखंड भारत या विषयावरील पुस्तक प्रकाशन, अखंड भारत संमेलन, अखंड भारत शोभायात्रा अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन आतापर्यंत सातत्याने करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाबरोबरच, या व्यासपीठाचे आणि हे विचार पुढे नेण्याच्या दृष्टीने एक मुखपत्र असावे, या उद्देशाने ‘सांस्कृतिक भारत’ या त्रेमासिकाचे नियोजन आणि दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन हे गेले काही वर्षे नियमितपणे सुरु आहे.
भविष्यातील वाटचाल-
अखंड भारत ही फक्त एक संकल्पना नसून भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक अखंडता हा त्या मागचा मूलभूत गाभा आहे. अखंड भारत व्यासपीठ याचं ध्यासाने सातत्यपूर्वक काम करत आहे आणि या पुढेही करत राहील. या पुढील काळात वैचारिक लढाई हि विक्राळ रूप घेणार आहे. या वैचारिक लढाईत, योग्य, चोख आणि सत्याची कास धरून, परखड मत व्यक्त करणे, योग्य बाजू समाजासमोर मांडणे, समाज मनात राष्ट्रीय महत्वाचे विषय पोहचवणे हे आणि असे विविध प्रकारचे मोलाचे योगदान अखंड भारत व्यासपीठ पार पडणार आहे. राष्ट्रहिताचे सर्व विषय अत्यंत प्राथमिकतेने घेऊन त्यावर अखंड भारत व्यासपीठ त्यावर काम करणार आहे.
हे ही वाचा:
परशुराम हिंदू सेवा संघाच्या पुणे महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी अमृता देवगावकर
भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात बांगलादेशींना अटक!
टोरेस घोटाळा : सीईओ तौसीफ रियाझच खरा सूत्रधार, झाली अटक
अखंड भारत व्यासपीठाला आता २५ वर्षे होत आहेत आणि भारतीय संविधानास ७५ वर्षे. या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून अखंड भारत व्यासपीठ, या वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. त्यातील काही महत्वाचे कार्यक्रम खालील प्रमाणे असतील:
- संविधानाचा मसुदा ज्या थोर आणि महान विभूतींनी बनवला, त्यांच्या जन्मस्थानी आणि कर्मस्थानी संविधान यात्रा काढण्यात येईल.
- संविधानाचे खरे मारेकरी कोण? या विषयावर महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टया महत्वाच्या स्थानांवर चर्चासत्र आणि कार्यक्रम घेण्यात येतील.
- संविधान वाचनाचे सामुहिक संमेलन आणि सप्ताह घेण्यात येतील.
- मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे जिहाद या विषयी जागरण, CAA, NRC, UCC आदी संबंधी जागरण, आणि आवश्यक ते सर्व कार्य करण्यात अखंड भारत व्यासपीठ हे अग्रणी आणि तत्पर असेल.
- स्वर्गीय मुझ्झफर हुसेन व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे. अनेक मान्यवर यामध्ये आपले विचार मांडणार आहेत.
अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन लवकरच होईल आणि सर्व समाजाने ह्यामध्ये सहभागी व्हावे आणि योगदान द्यावे, असे आवाहन अखंड भारत व्यासपीठाचे अध्यक्ष संजय ढवळीकर यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनी समस्त हिंदू समाजाला केले आहे.