भारतीय महिला संघाने विश्वचषकावर नाव कोरत इतिहास घडवल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही माहिला संघाला विशेष शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. मात्र, त्यांनी केलेल्या पोस्टनंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधत खरपूस समाचार घेतला आहे. महिला रात्री उशिरा बाहेर असल्याबद्दलच्या त्यांच्या अलिकडच्या वादग्रस्त विधानाची आठवण भाजपाने त्यांना करून दिली आहे.
नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवून भारताचा पहिला महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला. यानंतर काही तासांतच ममता यांनी अभिनंदन करणारी पोस्ट केली. एक्सवर बोलताना बॅनर्जी यांनी लिहिले की, “आज संपूर्ण देशाला आमच्या महिला संघाच्या विश्वचषक अंतिम सामन्यातील कामगिरीबद्दल अविश्वसनीय अभिमान वाटत आहे. त्यांनी दाखवलेला संघर्ष आणि संपूर्ण स्पर्धेत त्यांनी दाखवलेले नियंत्रण तरुण मुलींच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. तुम्ही सिद्ध केले आहे की तुम्ही सर्वोच्च स्तरावर एक जागतिक दर्जाचा संघ आहात आणि तुम्ही आम्हाला काही अतिशय उत्तम क्षण दिले आहेत. तुम्ही आमचे नायक आहात. भविष्यात अनेक मोठे विजय तुमची वाट पाहत आहेत. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत!”
यानंतर भाजपच्या अधिकृत हँडलवरून दुर्गापूरमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाबाबत गेल्या महिन्यात बॅनर्जी यांनी केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांचा उल्लेख करण्यात आला. भाजपच्या पोस्टमध्ये लिहिण्यात आले होते की, “अरे देवा, त्या १२ वाजेपर्यंत खेळत होत्या, पण तुम्ही त्यांना ८ वाजेपर्यंत घरी येण्यास सांगितले होते,” अशी पोस्ट करत भाजपाने ममता यांना सणसणीत टोला लगावला.
OMG they were playing till 12❗️
But you had told them to be home by 8‼️#Raat8Ta #WomensWorldCup2025 https://t.co/OQ9bReYVmv
— BJP West Bengal (@BJP4Bengal) November 2, 2025
हे ही वाचा:
दिव्यांग हक्कांचे संरक्षण : आयुक्तांची कार्यपद्धती निश्चित
स्वप्नात देवाचे दर्शन होणे हे कसले संकेत ?
देव उठनी एकादशी निमित्त आदर्श बंधु संघाचा अनोखा सेवा उपक्रम
नवनीत राणा यांना दुसऱ्यांदा बॉम्बने उडवण्याची धमकी
भाजपाच्या या टिप्पणीमागे ममता यांनी ऑक्टोबरमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करण्याचा उद्देश होता. त्यांनी पीडिता “रात्री १२.३० वाजता बाहेर का होती?” असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, विशेषतः रात्रीच्या वेळी मुलींना बाहेर येऊ दिले जाऊ नये. त्यांना स्वतःचेही संरक्षण करावे लागेल, असे वादग्रस्त विधान केले होते. ममता यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली होती. टीकाकारांनी त्यांच्यावर राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याऐवजी पीडितांना दोष देण्याचा आरोप केला होता.







