‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या युवा आंदोलनाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर कारवाई झाल्याचा गंभीर आरोप संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. दिपके यांनी सोशल मीडियावर दावा करत म्हटले की, CJP चे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट हटवण्यात आले असून त्यामुळे लाखो समर्थकांशी संपर्क साधण्याचे प्रमुख माध्यम बंद झाले आहे. या कारवाईमागे नेमके कारण काय आहे, याबाबत अद्याप मेटाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
अभिजीत दिपके यांनी ही कारवाई केवळ तांत्रिक नसून आंदोलनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, CJP चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे विद्यार्थी, बेरोजगार युवक आणि आंदोलनाशी संबंधित माहिती पोहोचवण्याचे महत्त्वाचे माध्यम होते. अकाउंट हटवल्यामुळे लाखो फॉलोअर्सपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण झाला असून समर्थकांना अधिकृत माहिती मिळवणे कठीण झाले आहे, असेही त्यांनी म्हटले.
हे ही वाचा:
शिवसेना खासदार विलिनीकरण प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
लाठीचार्जप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार
इटर्नलची तुफान झेप! नफ्यात २६८ टक्क्यांची उसळी
शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला
दिल्लीतील सुरू असलेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने या कारवाईबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. अलीकडील आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांवर करण्यात आलेले आरोप, न्यायालयीन घडामोडी आणि सोशल मीडियावरील वाढती लोकप्रियता यामुळे CJP सतत चर्चेत आहे. अशा परिस्थितीत इन्स्टाग्राम अकाउंट हटवल्याच्या दाव्याने या वादाला आणखी एक नवे वळण मिळाले आहे.
दरम्यान, मेटा किंवा संबंधित अधिकृत यंत्रणेकडून अकाउंट हटवण्यामागील कारणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे ही कारवाई प्लॅटफॉर्मच्या धोरणांनुसार झाली की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत स्पष्टता येणे बाकी आहे.







