भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासोबत १४ जून रोजी पॅलेस डेस एक्स्पोजिशन्स डी नीस येथे ‘भारत इनोव्हेट्स २०२६ ’ चे उद्घाटन करणार आहेत. भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात येणारा ‘भारत इनोव्हेट्स २०२६’ हा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम आहे. यात १२० भारतीय नवोन्मेषक, १५ उच्च शिक्षण संस्था (HEIs) आणि ५०० हून अधिक गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत. यामध्ये मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, व्हेंचर कॅपिटल फर्म्स, जागतिक सीईओ आणि उद्योग क्षेत्रातील नेते यांचाही समावेश असेल.
या कार्यक्रमात अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, सेमिकंडक्टर, अवकाश तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, ऊर्जा, आरोग्यसेवा आणि उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) यांसह १३ प्रमुख क्षेत्रांचा समावेश असेल. यामधून भारताच्या वाढत्या नवोन्मेष आणि डीप-टेक परिसंस्थेचे प्रदर्शन केले जाईल.
पंतप्रधान मोदींसोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीचीही अपेक्षा आहे. तसेच भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार अजयकुमार सूद देखील उपस्थित राहणार आहेत.
‘भारत इनोव्हेट्स २०२६ ’चे पहिले सत्र नीस येथे जागतिक गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रासमोर भारतातील डीप-टेक स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांना सादर करेल. हा कार्यक्रम भारत आणि जागतिक भागीदारांमधील नवोन्मेष-आधारित सहकार्याला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ ठरेल, अशी अपेक्षा आहे.
कार्यक्रमादरम्यान डीप-टेक, संशोधन व विकास, स्टार्टअप विस्तार आणि सीमापार गुंतवणूक सुलभतेसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा आणि सहकार्य करार होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमधील ४ हजार ईव्हीएम मशीन जळाल्या
मध्य प्रदेशातील दोन शूटर लपले होते मुंबईत
फाटकमुक्त रेल्वे, महाराष्ट्राचे दूरगामी पाऊल
हा उपक्रम भारत आणि फ्रान्सच्या नवोन्मेष परिसंस्थांमधील संस्थात्मक भागीदारीच्या नव्या संधींनाही अधोरेखित करेल. सह-विकास, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांच्या वेगवान विकासावर विशेष भर दिला जाणार आहे.
‘भारत इनोव्हेट्स २०२६’चा उद्देश भारतीय नवोन्मेषक आणि संस्थांना गुंतवणूकदार, उद्योग समूह, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि सरकारी भागधारकांशी जोडणे हा आहे. यामुळे गुंतवणूक, तंत्रज्ञान पडताळणी, सह-विकास, पायलट प्रकल्प, उत्पादन भागीदारी, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जागतिक बाजारपेठेत विस्तारासाठी मार्ग मोकळा होईल.
या उपक्रमामुळे जागतिक नवोन्मेष नेटवर्कसोबत भारताचे संबंध अधिक दृढ होतील आणि तंत्रज्ञानाधारित विकास व उद्योजकतेसाठी भारताचे स्थान अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हा कार्यक्रम भारत फ्रान्स नवोन्मेषाचे वर्ष अंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन फेब्रुवारी २०२६ मध्ये मुंबई येथे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे केले होते.







