काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम हे सध्या पुन्हा चर्चेत येत आहेत. यावेळी त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारसंदर्भात केलेली टिप्पणी चर्चेत आली आहे. माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निर्देशानुसार अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी केलेले “ऑपरेशन ब्ल्यू स्टार” हे चुकीच्या पद्धतीने राबवले गेले, आणि त्या चुकीची किंमत इंदिरा गांधींना स्वतःच्या जीवाने चुकवावी लागली.
हिमाचल प्रदेशातील कसौली येथे झालेल्या खुशवंत सिंग लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये, पत्रकार हरिंदर बावेजा यांच्या ‘They Will Shoot You, Madam’ या पुस्तकावर चर्चासत्रादरम्यान चिदंबरम यांनी हे विधान केले.
ते म्हणाले, “इथे उपस्थित असलेल्या कोणत्याही सेवा अधिकाऱ्याचा अनादर न करता सांगतो, पण सुवर्ण मंदिर अतिरेक्यांकडून परत मिळवण्याची ती पद्धत चुकीची होती. तीन-चार वर्षांनी आम्ही दाखवले की ते कसे योग्य रीतीने करता येऊ शकते — सैन्य न पाठवता.”
“ब्ल्यू स्टार ही एकत्रित चूक होती”
चिदंबरम पुढे म्हणाले, “सर्व दहशतवाद्यांना पकडण्याचा आणि सुवर्ण मंदिर मुक्त करण्याचा योग्य मार्ग होता. ब्ल्यू स्टार ही चुकीची दिशा होती. मी मान्य करतो की, इंदिरा गांधींनी त्या चुकीची किंमत जीव देऊन मोजली, पण ही चूक फक्त त्यांची नव्हती, ती सैन्य, पोलीस, गुप्तचर विभाग आणि नागरी प्रशासनाच्या सामूहिक निर्णयाची परिणती होती. त्यामुळे सगळा दोष केवळ इंदिरा गांधींवर देता येणार नाही.”
हे ही वाचा:
गाझामधून इस्रायली बंधकांची सुटका सोमवारपासून सुरू!
‘सर तन से जुदा’चे नारे देणाऱ्या सात जणांच्या मुसक्या आवळल्या
“बांगलादेशात हिंदूंवर कोणताही हिंसाचार नाही, ही भारतीय बनावट बातमी आहे”
ट्रम्प यांची साखरपेरणी; पंतप्रधान मोदी तुम्ही महान आहात!
ऑपरेशन ब्ल्यू स्टार काय होते?
ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे १ जून ते ८ जून १९८४ दरम्यान राबवण्यात आले होते. पंजाबमधील वेगळ्या खलिस्तान राष्ट्राच्या मागणीसाठी उभ्या राहिलेल्या धार्मिक नेते जरनैल सिंह भिंड्रनवाले यांच्या चळवळीला थांबवण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आले.
भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांनी सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला होता आणि त्यामुळे भारतीय सैन्याने मंदिरात प्रवेश करून ही कारवाई केली. या मोहिमेत अकाल तख्त (सिख धर्मातील सर्वोच्च धार्मिक संस्था) उद्ध्वस्त झाले. या घटनेनंतर संपूर्ण शीख समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरला.
इंदिरा गांधींची हत्या आणि त्यानंतरचे दंगे
ऑपरेशननंतर काही महिन्यांतच, ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी, इंदिरा गांधींची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर देशभरात शीखविरोधी हिंसाचार उसळला.
सरकारी आकडेवारीनुसार दिल्ली आणि इतर ठिकाणी ३,००० हून अधिक शीखांचा मृत्यू झाला. अनेक काँग्रेस नेत्यांवर या हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा संशय व्यक्त झाला होता.
काँग्रेसवर कायमचा डाग
१९८४ च्या या घटनाक्रमामुळे काँग्रेस पक्षावर कायमचा राजकीय डाग लागला आहे. राजीव गांधींचे त्या काळातील विधान होते की, “जेव्हा मोठं झाड कोसळतं, तेव्हा जमीन हलते,” हे आजही पक्षाला त्रासदायक ठरते. भारतीय जनता पक्ष (भाजप) वारंवार या घटनांचा उल्लेख करून काँग्रेसवर टीका करत राहतो.







