दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि आम आदमी पक्षाची भ्रष्टाचारी राजवट जनतेने उधळल्याबद्दल जनतेचे आभार मानले.
मोदी म्हणाले की, ज्या पक्षाचा जन्मच भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून झाला. तेच भ्रष्टाचारात आकंठ बुडाले. त्यांचे मंत्रीच नव्हेत तर मुख्यमंत्रीही भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर तुरुंगात गेले. स्वत:ला इमानदारीचं प्रमाणपत्र देणारेच भ्रष्टाचारी निघाले. दारू घोटाळ्याने दिल्लीची बदनामी केली. त्यांना अहंकार एवढा होता की, लोक कोरोनाने होरपळत असताना हे आपदावाले शीशमहल बनवण्यात गुंग होते. आपला प्रत्येक घोटाळा लपवण्यासाठी त्यांनी नवनवे षडयंत्र रचले. पहिल्या विधानसभा अधिवेशनात सीएजीचा अहवाल सभागृहात ठेवला जाईल. त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होईल. ज्याने जनतेला लुटले आहे, त्यांना त्याची भरपाई करावी लागेल, ही देखील मोदींची गॅरंटी आहे.
शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यालयात आले आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत केले. त्यावेळी बोलताना मोदींनी सांगितले की, दिल्लीच्या जनतेने शॉर्टकटवाल्यांचे ‘शॉटसर्किट’ केले. मोदी म्हणाले, जे लोक दिल्ली आपल्या मालकीची असल्याचे सांगत होते, त्यांना जनतेने दाखवून दिले की दिल्लीचे खरे मालक फक्त आणि फक्त दिल्लीची जनता आहे. ज्यांना दिल्लीचे मालक होण्याचा अहंकार होता, त्यांचा अहंकार या निवडणुकीत जनतेने मातीत मिसळला आहे. याचा अर्थ, राजकारणात शॉर्टकट अन् बनाव यांना कोणतेच स्थान नाही, हे दिल्लीतील जनतेने स्पष्ट केले आहे. मोदी म्हणाले, दिल्लीच्या जनतेने लोकसभेत भाजपला कधीच निराश केले नाही. गेल्या तीन निवडणुकांत भाजपला सातच्या सात जागांवर विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजच्या निकालाने दुसरी बाजू समोर आली आहे. दिल्लीत देशभरातून आलेले लोक आहेत. त्यामुळे दिल्ली मिनी भारत आहे. दिल्लीत दक्षिण भारतातील लोक आहेत. तसेच पश्चिम भारतातील लोकही आहेत. पूर्व भारतातील लोक आहेत त्याप्रमाणे उत्तर भारतातील लोकही आहेत. विविधतेने भरलेली दिल्ली भारताचे लघू रूप आहे, असे मोदी यांनी सांगितले.
अण्णा हजारेंची पीडा गेली
यावेळी मोदींनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंचाही उल्लेख करत सांगितले की, मी अण्णा हजारे यांचं विधान ऐकत होतो. अण्णा हजारे हे बऱ्याच काळापासून आपदावाल्याची पीडा झेलत होते. त्यांनाही या पिडेतून मुक्ती मिळाली असेल.
मोदी म्हणाले की, जिथे एनडीए आहे तिथे सुशासन आहे. विकास आहे, विश्वास आहे. एनडीएचा प्रत्येक उमेदवार, लोकप्रतिनिधी लोकांच्या हिताचं काम करत आहे. एनडीएला जेव्हा जनादेश मिळतो तेव्हा राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले जाते. त्यामुळेच भाजपला सातत्याने विजय मिळत आहे. लोकांनी आम्हाला उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, आसाम, मणिपूर प्रत्येक राज्यात दुसऱ्यांदा सत्ता दिली आहे. एकेकाळी उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था हे मोठं आव्हान होतं. महिलांना तर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागे. पण आम्ही त्याचा अंत करण्याचा निश्चय केला.
यमुना मैय्या की जय
मोदींनी आपल्या भाषणाच्या प्रारंभी आणि शेवटी यमुना मैय्या की जय असा जयघोष करत दिल्लीतील सत्ताकाळात यमुना नदीच्या स्वच्छतेचे धोरण प्राधान्याने अमलात आणणार असल्याचे संकेत दिले. ते म्हणाले, भाजपचे सरकार आले आहे. यमुना ही दिल्लीची ओळख असेल. हे काम कठीण आहे. दीर्घ काळ त्याची प्रतीक्षा आहे. मात्र कितीही वेळ गेला, शक्ती कितीही लागली तरी हा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. यमुना स्वच्छ करणार.
हे ही वाचा:
अहंकारी, मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारा!…
भाजपाने केजरीवाल यांच्या हत्यारानेच त्यांना संपवले…
‘दिल्लीत इंडी आघाडी असती तर भाजपाला २० पेक्षा अधिक जागा मिळाल्या नसत्या!’
२७ वर्षानंतर पुन्हा भाजप येत आहे
काँग्रेसने शून्याची हॅट्ट्रिक केली
काँग्रेसला या निवडणुकीत भोपळा मिळाला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काही वर्षांपूर्वी त्यांनी हिंदू असण्याचे ढोंग केले. प्रत्येक मंदिरात फिरले. पण निवडणुकीत काँग्रेसने शून्याची डबल हॅट्ट्रिक केली आहे. देशाच्या राजधानीत देशातील सर्वात जुन्या पक्षाचा आपले खातेही उघडता येत नाही. हे लोक स्वत:ला पराजयाचे गोल्ड मेडल देऊन फिरत आहेत.
मोदी म्हणाले, काँग्रेस एक परजीवी पक्ष आहे. स्वत: बुडते आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनाही बुडवते. काँग्रेस एकामागून एक आपल्या सहकाऱ्यांना संपवत आहे. काँग्रेस आपल्या सहकाऱ्यांचा अजेंडा चोरते. त्यांची व्होट बँक लुटते. उत्तर प्रदेशातही समाजवादी पक्षाला आणि बहुजन समाजवादी पक्षाचे मतदार त्यांनी चोरले. परंतु काँग्रेसला मुलायम सिंह यादव यांनी ओळखले होते. ते अखिलेश यादवा यांना ओळखता आले नाही. काँग्रेस आपल्याला संपवत आहे, हे त्यांच्या सहकारी पक्षांना कळते. तसेच इंडिया आघाडीवाल्यांना ते कळत आहे. त्यामुळेच दिल्लीत इंडिया आघाडीचे सर्व लोक दिल्लीत काँग्रेसच्या विरोधात उतरले होते. त्यांना काँग्रेसने लुटलेली मते मिळवायची होती.
देशात आज जी काँग्रेस आहे ती पूर्वीची काँग्रेस नाही असे म्हणत मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या काळात जी काँग्रेस होती ती आज नाही. आज काँग्रेस देशहिताची नाही तर अर्बन नक्षल्यांची भाषा बोलत आहे. त्यांच्यासाठी राजकारण काँग्रेस करत आहे. काँग्रेसचे नेते म्हणतात, भारताशी लढतोय. इंडियन स्टेटसची लढत आहे. ही नक्षलवाद्यांची भाषा आहे.