दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. भाजपाने जवळपास ४७ जागी विजय मिळविला असून २७ वर्षांनी भाजपाचे सरकार दिल्लीत येणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आमदार रोहित पवार यांनी टिप्पणी केली आहे. त्यांच्या मते इंडी आघाडी दिल्लीत असती तर भाजपाला २० जागांपेक्षा अधिक जागा मिळू शकल्या नसत्या.
त्यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! १५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता इंडिया आघाडी असती तर भाजपा २० जागांच्यावर देखील गेली नसती. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती.
हे ही वाचा:
२७ वर्षानंतर पुन्हा भाजप येत आहे
केजरीवाल म्हणतात रचनात्मक विरोधी पक्षाचे काम करू
मोरे महाराजांच्या मृत्यूचे ओझे कोणाच्या खांद्यावर?
१८३ पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात हमास तीन ओलिसांची सुटका करणार
ते लिहितात की, उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब पारंपरिक पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी.
आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे इंडी आघाडीचे सदस्य असले तरी दिल्लीत मात्र ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्यावर प्रचारादरम्यान अनेक घणाघाती आरोप केले. ते एकत्र लढले नाहीत त्यामुळेच दिल्लीत आम आदमीचा पराभव झाला असे रोहित पवार यांचे म्हणणे आहे. पण महाराष्ट्रात इंडी आघाडी, महाविकास आघाडी एकत्र लढूनही विधानसभा निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ झाला होता. रोहित पवार यांच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या असून लोकांनी इंडी आघाडीला महाराष्ट्रात मग यश का मिळू शकले नाही, असा सवाल विचारला आहे.