संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी केलेली आत्महत्या आर्थिक विवंचनेतून केली असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या वर ३२ लाखांचे कर्ज होते. कर्ज डोक्यावर असले तरी त्याचे ओझे थेट तुमच्या काळजावर असते. या ओझ्या खाली ते बराच काळ गुदमरले असावेत. एक कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ता. संघाचा स्वयंसेवक. गड किल्ल्यांवर बनलेल्या अनधिकृत मजारी त्यांना प्रचंड अस्वस्थ करायच्या. या मजारींची माहीत संकलित करून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाची मशाल घेऊन ते गावोगावी फिरले होते. एक कलंदर कार्यकर्ता अकाली निघून गेला. मोरे महाराजांच्या मृत्यूचे ओझे कोणाच्या खांद्यावर आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. वय वर्षे अवघे तीस, अलिकडेच साखरपुडा झालेला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचे जीव की प्राण. वकृत्व इतके ओघवते की जीभेवर साक्षात सरस्वतीच बसली आहे, असे वाटावे. बोलायला लागले की हजारो लोकांना खिळवून ठेवण्याची क्षमता. जेव्हा मोरे महाराजांच्या निधनाची बातमी समोर आली तेव्हा अनेकांना वाटले होते, की ते एखाद्या षडयंत्राचा बळी ठरले असतील.