दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. भाजपाने आम आदमी पक्षाच्या दोन टर्मच्या सत्तेला सुरुंग लावला असून तब्बल २७ वर्षांनी पुन्हा एकदा राजधानीत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत अनपेक्षितपणे आपच्या बड्या नेत्यांचा पराभव झाला असून आपने राजधानी दिल्लीत हॅट्रिक करण्याची संधी गमावली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले आणि ८ फेब्रुवारी रोजी निकाल स्पष्ट झाला. दिल्लीत यंदा तिहेरी लढत रंगली होती. आप, काँग्रेस आणि भाजपा असे तीन प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. ‘इंडी’ आघाडीत मित्र पक्ष असलेले काँग्रेस आणि आप हे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र उतरले होते. ‘आप’ची वाटचाल ही हॅट्रिक साधण्यासाठी होती तर भाजपची लढाई २७ वर्षांनंतर सत्ता मिळवण्यासाठी होती. शिवाय तिसरा प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसची अस्तित्वाची लढाई होती.
दिल्लीच्या लढतीत भाजपाने बाजी मारत आप आणि काँग्रेसचा सत्तेत बसण्याचा मनसुबा हाणून पाडला आहे. दिल्लीकरांनी भाजपाला साथ देत बहुमतापेक्षा अधिक आकडा दिला आहे. भाजपाला तब्बल ४७ जागांवर यश मिळाले आहे. दोन टर्म सत्तेत असणाऱ्या आप पक्षाला २३ ठिकाणी यश आले असून जनतेने सत्तेपासून मात्र दूर ठेवले आहे. शिवाय अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांची जागा राखली असली तरी आप सत्तेपासून दूर आहे.
दिल्लीच्या अस्तित्वाच्या लढाईत काँग्रेस पक्षाची चांगलीच नाचक्की झाली आहे. काँग्रेसच्या पदरात एकही जागा आलेली नाही. राजधानी दिल्लीमधून काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे बोलले जात आहे. प्रचारादरम्यान काँग्रेसकडून आपवर निशाणा साधण्यात आला होता. मात्र, त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ उमेदवारांचाही पराभव झाला आहे.
२०२० मध्ये भाजपला फक्त आठ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आता पाच वर्षांनी यात तब्बल सहा पट वाढ होत भाजपाच्या खात्यात ४८ जागा आहेत. ‘आप’च्या जागा कमी झाल्या असून यावेळीही काँग्रेस रिकाम्या हातानेच राहिली आहे. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
हे ही वाचा..
केजरीवाल म्हणतात रचनात्मक विरोधी पक्षाचे काम करू
दिल्ली सचिवालयातून कोणतेही कागद, फाइल्स बाहेर जाता कामा नयेत!
‘आप’ला धक्का! अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया पराभूत; आतिशी यांचा विजय
२७ वर्षानंतर पुन्हा भाजप येत आहे
दिल्लीमध्ये काही बड्या नेत्यांच्या लढतीकडे विशेष लक्ष होते. आपचे मनिष सिसोदिया हे जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला असून भाजपाचे तरविंदर सिंग मारवाह या ठिकाणाहून विजयी झाले आहेत. जंगपुरा मतदारसंघातून त्यांचा ६०० मतांनी पराभव झाला. आपसाठी दुसरा मोठा झटका म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा परभव. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले. भाजपच्या परवेश वर्मा यांनी ३१८६ मतांनी केजरीवाल यांचा पराभव केला. शिवाय मालवीय नगरमधून आपच्या सोमनाथ भारती यांचाही पराभव झाला. शकूर बस्ती मतदारसंघातून भाजपच्या कर्नैल सिंह यांनी सत्येंद्र जैन यांचा पराभव केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या ही सुरुवातीच्या अनेक फेऱ्या पराभवाच्या छायेत होत्या. मात्र शेवटच्या फेरीत मिळालेल्या आघाडीनंतर त्यांचा विजय झाला आहे. कालकाजी मतदारसंघातून आतिशी २७०० मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या रमेश बिधुरी यांचा पराभव केला.