दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीचे मतदारांनी विसर्जन केले. जनतेचा संताप एवढा होता की, पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदीया यांचाही कडेलोट करून टाकला. मिर्जा गालिबचा शेर आहे, ये बंद करने आये थे तवायफो के कोठे, मगर सिक्को की खनक देख कर खुदही नाच बैठे…. भ्रष्टाचार संपवण्याच्या बाता करून सत्तेवर आलेल्या आणि सत्ता राबवताना आकंठ भ्रष्टाचारात बुडालेल्या नेत्यांना जनतेने धडा शिकवला. भाजपाने केजरीवाल यांच्या हत्यारानेच त्यांचा गेम करून टाकला. हीच या विजयाची काळी किनार आहे.
गोष्ट यूपीए सरकारच्या काळातील आहे. भ्रष्टाचाराने देशात कळस गाठला होता. सर्वसामान्य जनतेला भ्रष्टाचाराच्या झळा बसू लागल्या होत्या. देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी दिल्लीत एक आंदोलन सुरू झाले. इंडीया अगेन्स्ट करप्शन. या आंदोलनाचे एक कर्ते अरविंद केजरीवाल या लाटेवर स्वार झाले. राजकारणात कधीही पाऊल ठेवणार नाही ही शपथ त्यांनी गुंडाळून ठेवत ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. भ्रष्टाचार विरोधाचे राजकारण करणारे भ्रष्टाचारात आकंठ लडबडले. मतदारांचा संताप किती होता हे लक्षात घ्या, त्यांनी फक्त केजरीवाल यांची सत्ता हिरावली नाही, त्यांना आमदारही बनू दिले नाही.
दिल्लीत २०१३ मध्ये आम आदमी पार्टी सत्तेवर आली. त्यानंतर काही काळ राष्ट्रपती शासन, २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादित करून केजरीवाल दुसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. २०२० च्या निवडणुकीतही त्यांनी विरोधकांच्या वाट्याला फार काही येऊ दिले नाही.
२०१२ साली अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले इंडीया अगेन्स करप्शन हे आंदोलन अभूतपूर्व होते. या काळात दिल्लीत मंतरलेले वातावरण होते. या काळात अनेक तरुण आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झाले. कुमार बिस्वास हे कवी त्यातलेच एक. आपल्या प्राध्यापकीचा राजीनामा देऊन ते या चळवळीत सहभागी झाले. या काळात दिल्लीच्या हवेत या आंदोलनाचा गंध जाणवत होता. सर्वसामान्य माणूस या आंदोलनाने भारलेला दिसत होता. हे आंदोलन देशाचे भवितव्य बदलेले अशी स्वप्न लोकांना पडू लागली होती. परंतु केजरीवाल आणि त्यांच्या टोळीने हे आंदोलन अक्षरशः हायजॅक केले. आज सुमारे १३ वर्षांने त्या स्वप्नाचा झालेला कोळसा दिल्लीच्या मतदारांनी केजरीवाल यांच्या तोंडाला फासला आहे.
केजरीवाल यांच्या विजयानंतरही लोकसभा निवडणुकीत कधीही त्यांना यश मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीत लोक भाजपावर विश्वास दाखवत नव्हते, त्याची काही ठोस कारणे होती. दिल्ली नगर निगममध्ये वर्षोनुवर्षे भाजपाचे वर्चस्व होते. तिथे स्थानिक नेतृत्वाने मोठी घाण करून ठेवली होती. त्यामुळे लोकांचा भाजपावर रोष होता. २०२२ च्या निवडणुकीत दिल्ली नगर निगम निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाला. त्यामुळे लोकांचा वचपा पूर्ण झाला होता. इथून भाजपाला जो झटका मिळाला तो पक्षाचे भले करून गेला. झोपा काढत राहिलो तर २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत काय होऊ शकेल, याची ही झलक होती. त्यानंतर पक्ष संघटना खडबडून जागी झाली. पक्षाच्या नेत्यांनी तळागाळापर्यंत संपर्कासाठी व्यापक मोहीम राबवली.
भाजपासाठी सगळ्यात मोठे आव्हान होते ते केजरीवाल यांच्या फूकट वीज आणि पाणी या घोषणांचे. या घोषणांचा प्रभाव दिल्लीतील झोपडपट्ट्या असलेल्या २१ विधानसभा मतदार संघात होता. इथे विजय हवा असेल तर केजरीवाल यांचे फुकट अस्त्र निकामी केल्या शिवाय तो शक्य नव्हता. त्यामुळे आधीच्या सरकारची कोणतीही योजना बंद करणार नाही, असे भाजपाने स्पष्ट केले. केजरीवाल यांनी यावर तिखट टिप्पणीही केली. भाजपाचे घोषणापत्र म्हणजे केजरीवाल घोषणापत्रच आहे. सगळ्या आमच्या घोषणांचा त्यात उल्लेख आहे, असे ते म्हणाले. खरे तर या फुकट घोषणांची भाजपाला लागलेली लागण हा देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. केजरीवाल यांच्यापासून प्रेरणा घेत भाजपाने मध्यप्रदेशात लाडली बहीण, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवल्या. त्याचा त्यांना फायदाही झाला. त्याचीत पुनरावृत्ती दिल्लीत झालेली दिसते आहे. ही भाजपाने दिल्लीतील विजयासाठी चुकवलेली किंमत आहे. ही फुकट संस्कृती भविष्यात देशाला जड जाणार आहे.
२७ वर्षांनी भाजपाची दिल्लीत सत्ता येते आहे. भाजपाच्या विजयाने जसा अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणाचा बाजार उठवला आहे, त्याच प्रमाणे इंडी आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह लावले आहे. या संपूर्ण निवडणुकीत राहुल गांधी केजरीवालांच्या दारु घोटाळ्याबाबत बोलत होते, तर केजरीवाल राहुल गांधी यांच्या नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून चिखलफेक करत होते. आपच्या पराभवानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री यांनी और लढो… असे म्हणत दोघांना टोला लावला आहे. सपा, तृणमूल काँग्रेसचे नेते केजरीवाल यांच्यासाठी राबत होती, त्यांचे श्रम वाया गेलेले दिसतात. चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण, जदयूच्या नेत्यांनी यांनी दिल्लीत भाजपासाठी प्रचार केला. एका बाजूला इंडी आघाडीत राडा सुरू असताना एनडीए मात्र या निवडणुकीमुळे अधिक बळकट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
निवडणुका जिंकताना अनेक आश्वासने द्यावी लागतात. आश्वासने द्यायची आणि नंतर सत्तेवर आल्यावर केंद्र सरकारकडे वाडगा पसरायचा, केंद्र सरकार निधी देत नाही, काम करू देत नाही, अशी रड करायची, राज्यपालांच्या विरोधात आंदोलने करायची हे सगळे प्रकार केजरीवाल यांनी केले. दिल्लीत जनतेच्या कृपेने मिळालेली सत्ता राबवण्यापेक्षा नौटंकी करण्यात त्यांनी १३ वर्ष घालवली. त्यालाच कंटाळून दिल्लीकरांनी केजरीवाल यांचे सामान बांधून त्यांना रवाना केलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवा शब्द पेरला. आपदा… हा शब्द बहुधा दिल्लीकरांनी मनावर घेतला असावा. दिल्लीत भाजपाचा विजय झाला तर मला पुन्हा तुरुंगात जावे लागेल. मी तुरुंगात जावे अशी तुमची इच्छा असेल तर भाजपाला मतं द्या, असे केजरीवाल वारंवार सांगत होते. दिल्लीकरांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. दिल्लीची जनता कोरोनाचे भोग भोगत असताना उभारलेला शीशमहल त्यांना फळला नाही. आपची सत्ता आली तर मीच मुख्यमंत्री बनेन असे सांगणाऱ्या केजरीवाल यांना दिल्लीकरांनी आमदार सुद्धा केले नाही. आतिषी यांनी आता मुख्यमंत्री पदानंतर विरोधी पक्षनेते पद मिळेल अशी शक्यता आहे.
हेही वाचा..
आम आदमी पक्षाचे यमुनेत विसर्जन; भाजपाने केली दिल्ली काबीज!
‘दिल्लीत इंडी आघाडी असती तर भाजपाला २० पेक्षा अधिक जागा मिळाल्या नसत्या!’
केजरीवाल म्हणतात रचनात्मक विरोधी पक्षाचे काम करू
दिल्ली सचिवालयातून कोणतेही कागद, फाइल्स बाहेर जाता कामा नयेत!
यमुनेतील प्रदूषण संपवू, साबरमती रिव्हर फ्रंट प्रमाणे यमुनेला सजवू असे आश्वासन भाजपाने दिलेले आहे. मुंबईत मिठी नदी नावाचे प्रकरण आहे, तोच प्रकार दिल्लीत यमुनेचा झालेला आहे. दिल्लीतील प्रदूषण हे सुद्धा दिल्लीकरांसाठी अवघड जागेचे दुखणे बनले आहे. आपच्या गोंधळाला विटलेल्या दिल्लीकरांनी २७ वर्षांनंतर भाजपाला मोठ्या विश्वासाने सत्ता दिलेली आहे. भाजपावर हा गोंधळ संपवण्याची जबाबदारी आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे. दिल्लीत आपच्या पराभवानंतर तीन माणसं प्रचंड खूष असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वाती मालीवाल आणि अण्णा हजारे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)