राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. यामुळे राजकीय चक्र फिरणार का अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, छगन भुजबळ हे त्यांची भूमिकाही स्पष्ट करणार होते. मात्र, छगन भुजबळ हे शनिवार, १८ जानेवारीपासून होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी शिर्डी येथे दाखल झाल्याने त्यांची नाराजी दूर झाल्याच्या चर्चा आहेत. मात्र, यावर छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, “नाराजी दूर झाली की नाही हा मुद्दा इथे येतचं नाही. हे पक्षाचे शिबीर असून कोणाही एका व्यक्तीचे शिबीर नाही. काल पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माझी भेट घेतली. तेव्हा आम्ही दोन तास बोललो आणि त्यांनी सांगितले की थोडा वेळ तरी तुम्ही शिबिराला यायला हवे. मला त्यांनी गळ घातली. पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनीही फोन करून सांगितले की थोडा वेळ तरी यायले हवे आणि म्हणूनचं मी आलो आहे. त्यांनी विनंती केली आणि मी शिबिराला उपस्थित राहण्यासाठी आलेलो आहे. पण, याचा अर्थ असा नाही की सगळ्या गोष्टी स्वच्छ झाल्या आहेत,” असं म्हणत छगन भुजबळ हे अद्याप नाराज असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. तसेच शिबिरासाठी अजित पवारांनी संपर्क साधलेल नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले.
हे ही वाचा:
शेख हसीना आणि बहिणीला ठार मारण्याचा कट होता!
युद्धविराम, ओलीस सोडण्याच्या कराराला इस्रायल सरकारकडून हिरवा कंदील
आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात हिंदू संघटनेला स्टॉल नाकारणाऱ्या आयोजकांना न्यायालयाने फटकारले
भारतीय महिला उपांत्य फेरीत; दक्षिण आफ्रिकेशी लढत
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी उघडपणे पक्षावरची त्यांची नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. तर, त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधून नाराजी दूर करण्याचा फारसा प्रयत्न केला नव्हता. बुधवारी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमदारभेटीच्या बैठकीतही भुजबळ सहभागी झाले नव्हते. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून होते. अखेर त्यांनी शिबिराला हजेरी लावली असली तरी त्यांची नाराजी दूर झालेली नाही हे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे.