स्टेडियम खचाखच भरलेलं होतं. लाखो चाहत्यांच्या नजरा खेळपट्टीवर खिळल्या होत्या. समोर होता आयपीएल २०२६ चा अंतिम सामना आणि क्रीजवर उभा होता एकच माणूस… विराट कोहली!
अठराव्या षटकातील शेवटचा चेंडू. विराटने बॅट फिरवली आणि चेंडू थेट सीमारेषेबाहेर जाऊन पडला. क्षणार्धात संपूर्ण अहमदाबाद जल्लोषात बुडालं. ड्रेसिंग रूममधील खेळाडू मैदानावर धावत आले. कारण तो फक्त षटकार नव्हता, तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सलग दुसऱ्या आयपीएल विजेतेपदाचा क्षण होता!
आरसीबीने गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सनी पराभव करत आयपीएल २०२६ ची ट्रॉफी उंचावली. या ऐतिहासिक विजयाचा सर्वात मोठा नायक ठरला तो म्हणजे विराट कोहली. त्याने अवघ्या ४२ चेंडूंमध्ये नाबाद ७५ धावांची धडाकेबाज खेळी करत सामना एकहाती फिरवला.
गुजरातने दिलेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला सुरुवातीलाच विराट आणि वेंकटेश अय्यर यांनी दमदार पाया घालून दिला. दोघांनी मिळून अवघ्या ४.३ षटकांत ६२ धावांची भागीदारी उभारली. वेंकटेश अय्यरने १६ चेंडूंमध्ये ३२ धावा करत गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.
मात्र त्यानंतर सामन्याने अचानक कलाटणी घेतली. देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार आणि कृणाल पंड्या हे झटपट बाद झाले. ६२ धावांवर एकही विकेट नसलेल्या आरसीबीची अवस्था ८९ धावांत ४ विकेट्स अशी झाली. गुजरात पुन्हा सामन्यात परतल्याचे चित्र दिसू लागले.
पण दुसऱ्या टोकाला विराट कोहली शांतपणे उभा होता. दबाव वाढत असताना त्याने अनुभव आणि संयम यांचा अप्रतिम मेळ घालत डाव सावरला. टिम डेविडसोबत त्याने महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. डेविडने १७ चेंडूंमध्ये २४ धावा करत विराटची उत्तम साथ दिली.
यानंतर विराटने गती वाढवली. अवघ्या २५ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत त्याने आयपीएल कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतकाची नोंद केली. चौकार-षटकारांची आतषबाजी करत त्याने गुजरातच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास खच्ची केला.
आणि मग आला तो क्षण…
विजयासाठी काही धावांची गरज असताना विराटने अठराव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला. चेंडू सीमारेषेबाहेर गेला आणि आरसीबीच्या खेळाडूंसह लाखो चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं. तब्बल १८ षटकांत ५ बाद १६१ धावा करत बंगळुरूने विजेतेपद आपल्या नावावर केलं.
याआधी प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सला ८ बाद १५५ धावांपर्यंतच मजल मारता आली. संपूर्ण स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी करणारे कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन अंतिम सामन्यात मात्र सपशेल अपयशी ठरले. गिलला १०, तर सुदर्शनला १२ धावांवर माघारी जावे लागले.
गुजरातकडून एकट्या वॉशिंग्टन सुंदरने ३७ चेंडूंमध्ये नाबाद ५० धावांची झुंजार खेळी केली. निशांत सिंधूने २०, जोस बटलरने १९, तर अरशद खानने १५ धावांचे योगदान दिले. मात्र इतर फलंदाजांना आरसीबीच्या गोलंदाजांनी कधीच स्थिरावू दिले नाही.
आरसीबीच्या गोलंदाजीमध्ये रसिख सलाम दार चमकला. त्याने ३ बळी घेत गुजरातच्या फलंदाजीचा कणा मोडला. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी २ बळी, तर कृणाल पंड्याने १ बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली.
सलग दुसऱ्या वर्षी ट्रॉफी जिंकत आरसीबीने आता आयपीएलमधील आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. पण या विजयाची ओळख कायम राहणार आहे ती एका चित्रामुळे…
क्रीजवर उभा विराट कोहली… आकाशात झेपावलेला चेंडू… आणि त्यानंतर सुरू झालेला लाल जर्सीधारी चाहत्यांचा जल्लोष!
आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्याची ही कथा आता क्रिकेटप्रेमी अनेक वर्षे विसरणार नाहीत.







