भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात अंजुम चोप्रा हे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे. दमदार फलंदाजी, शांत नेतृत्व आणि संघाला लढण्याची नवी ओळख देणाऱ्या अंजुम यांनी भारतीय महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली.
२० मे १९७७ रोजी नवी दिल्लीत जन्मलेल्या अंजुम चोप्रा यांचं बालपण खेळाडू वातावरणात गेलं. वडील गोल्फपटू, आई कार रॅली विजेती, तर भाऊ दिल्लीकडून क्रिकेट खेळले होते. सुरुवातीला त्यांची आवड बास्केटबॉलमध्ये होती, पण क्रिकेटशी जुळलेलं नातं आयुष्यभराचं ठरलं.
अंजुम यांनी १९९५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीने भारतीय संघात भक्कम स्थान निर्माण केलं. १९९९ मध्ये इंग्लंडविरुद्ध शतकीय खेळी करत वनडेमध्ये भारतासाठी शतक झळकावणाऱ्या त्या पहिल्या महिला क्रिकेटपटू ठरल्या.
भारतासाठी त्यांनी १२७ वनडे सामने खेळताना २ हजार ८५६ धावा केल्या. वनडेमध्ये हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला क्रिकेटपटू ठरल्या. त्यांच्या नावावर १ शतक आणि १८ अर्धशतकांची नोंद आहे. याशिवाय १२ कसोटी सामन्यांत ५४८ धावा, तर १८ टी-२० सामन्यांत २४१ धावा त्यांनी केल्या.
अंजुम यांनी भारतासाठी तब्बल ६ विश्वचषक स्पर्धा खेळल्या. २००५ च्या महिला विश्वचषकात भारताला अंतिम फेरीत पोहोचवण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.
फलंदाजीसोबतच त्यांच्या नेतृत्वानेही भारतीय महिला क्रिकेटला नवी दिशा दिली. कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत त्यांनी इंग्लंडविरुद्ध भारताला शानदार विजय मिळवून दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारताने पहिला ऐतिहासिक विजय नोंदवला. हा कसोटी सामना भारताने १० विकेट्सने जिंकला होता.
२०१२ मध्ये अंजुम चोप्रा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारतीय महिला क्रिकेटमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना २००७ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.







