बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात शुक्रवारी ढाका येथील शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. मात्र या सामन्यापेक्षा सलमान अली आघाच्या वादग्रस्त रनआउटची चर्चा अधिक रंगली आहे. अनेकांनी हा प्रकार खेळभावनेच्या विरोधात असल्याची टीका केली आहे.
ही घटना पाकिस्तानच्या डावातील ३९व्या षटकातील चौथ्या चेंडूवर घडली. मेहदी हसन मिराज यांच्या गोलंदाजीवर मोहम्मद रिझवानने चेंडू गोलंदाजाच्या दिशेने खेळला. चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात मिराज आणि नॉन-स्ट्रायकर एंडवर उभा असलेला सलमान अली आघा एकमेकांवर धडकले.
चेंडू थांबल्यामुळे आघाने धाव घेण्याचा विचार सोडला आणि चेंडू उचलून मिराजकडे देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी मिराज यांनी चेंडू उचलून थेट स्टम्प्सवर फेकला. त्या वेळी आघा क्रीजच्या बाहेर होते. बांग्लादेशने अपील केल्यानंतर तिसऱ्या पंचांनी त्यांना रनआउट घोषित केले.
या निर्णयानंतर हा प्रकार क्रिकेटच्या खेळभावनेच्या विरोधात असल्याची चर्चा सुरू झाली.
बांग्लादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराज यांनी सामन्यानंतर या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले,
“माझा हेतू फक्त चेंडू अडवण्याचा आणि संभाव्य धाव रोखण्याचा होता. तो क्रीजच्या बाहेर होता आणि मी फक्त चेंडूकडे जात होतो. जर मी चेंडू चुकवला असता तर ते सहज धाव घेऊ शकले असते, त्यामुळे मी स्टम्प्सवर थ्रो करण्याचा निर्णय घेतला.”
दरम्यान, पाकिस्तानच्या खेळाडूंनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. सलमान आघाने रागाच्या भरात आपले ग्लोव्हज आणि हेल्मेट मैदानावर फेकले आणि बांग्लादेशी खेळाडूंवर नाराजी व्यक्त केली. समालोचक आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार रमिझ राजा यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देत क्रिकेटमध्ये खेळभावना सर्वात महत्त्वाची असल्याचे म्हटले.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने माज सदाकत (७५), सलमान आघा (६४) आणि मोहम्मद रिझवान (४४) यांच्या खेळीच्या जोरावर २७४ धावा केल्या.
पावसामुळे बांग्लादेशला डीएलएस नियमांनुसार ३२ षटकांत २४३ धावांचे लक्ष्य देण्यात आले. मात्र बांग्लादेशचा संघ ११४ धावांतच गारद झाला आणि पाकिस्तानने १२८ धावांनी सामना जिंकला.







