आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना प्रभावी गोलंदाजी करत ४ षटकांत फक्त १९ धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतल्याने पर्पल कॅप मिळवलेल्या प्रसिद्ध कृष्णा याने आपल्या कामगिरीचे श्रेय वनडे क्रिकेटमध्ये मिळालेल्या अनुभवाला दिले आहे.
आयपीएलटी२० डॉट कॉमवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडीओत प्रसिद्ध म्हणतो, “ही माझ्यासाठी नक्कीच एक नवीन भूमिका होती, पण मी आधीपासून वनडेमध्ये यासारखीच जबाबदारी पार पाडली होती. पॉवरप्लेमधील ५वे व ६वे षटक कसे टाकायचे याचं ज्ञान मला आधीपासून होतं.”
तो पुढे म्हणाला की, “टूर्नामेंटपूर्वी थोडा दबाव होता कारण मी काही वर्षे हरवलेली होती. पण यंदा मी स्पष्ट ध्येय घेऊन आलो – चांगली गोलंदाजी करणं आणि जीटीला प्रत्येक सामना जिंकवून देणं.”
गुजरातने शनिवारी सनरायझर्स हैदराबादवर ३८ धावांनी मात केली. या विजयामुळे गुजरातने १४ गुण गाठले असून, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. संघाच्या या यशात गोलंदाजांच्या कामगिरीबरोबरच संघसंघटनेचा आणि नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याचं प्रसिद्धने स्पष्ट केलं.
प्रसिद्ध कृष्णाने कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक आशीष नेहरा यांच्या योगदानाचं विशेष कौतुक केलं.
“गिलला खेळाची उत्तम समज आहे. तो प्रत्येक खेळाडूशी योग्य संवाद साधतो आणि पिचबाबत महत्त्वाची माहिती देतो. नेहराजींची बैठकीची पद्धत खूप वैयक्तिक आहे. ते पिच, फलंदाज, परिस्थिती याचं बारकाईने विश्लेषण करून आमचं मार्गदर्शन करतात.”
हेही वाचा :
आतंकवाद्यांविरुद्ध भारत निर्णायक कारवाई करणार
पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व पोस्टल, पार्सल सेवांवर भारताकडून बंदी
“स्वतः सुसाईड बॉम्ब घेऊन पाकिस्तानात जाण्यास तयार…” कर्नाटकच्या मंत्र्यांनी का केले असे विधान?
केदारनाथमध्ये किती भक्तांनी घेतले दर्शन, जाणून घ्या !
शुभमन गिल, ज्याने या सामन्यात ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, त्यानेही संघाच्या एकजुटीचं कौतुक केलं.
“मी फलंदाज म्हणून काम पाहतो, पण जेव्हा सर्वजण आपापली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडतात, तेव्हाच संघ एक यशस्वी टीम बनतो. योजना आखणं एक गोष्ट आहे, पण ती यशस्वीपणे अंमलात आणणं – हे आमच्या गोलंदाजांनी सिद्ध करून दाखवलं आहे.”
शेवटी गिलने नेहरासोबतच्या समन्वयाबाबतही समाधान व्यक्त केलं. “ते खेळाविषयी भरपूर माहिती देतात आणि मी ती समजून घ्यायला नेहमी तयार असतो. ही जोडी संघासाठी फायद्याची ठरतेय,” असं तो म्हणाला.