भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला २० जूनपासून लीड्स येथे सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यासमोर एक ऐतिहासिक संधी आहे. बुमराह केवळ दोन बळी घेताच पाकिस्तानच्या दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम यांचा विक्रम मोडून काढू शकतो.
वसीम अक्रम यांनी एसईएनए देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) एकूण १४६ विकेट्स घेतल्या आहेत. सध्या बुमराहच्या नावावर १४५ बळी आहेत. पहिल्याच सामन्यात जर त्याने दोन बळी घेतले, तर तो एसईएनए देशांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा आशियाई गोलंदाज बनेल.
एसईएनए देशांतील खेळपट्ट्या जलद गोलंदाजीसाठी कठीण मानल्या जातात. मात्र, या परिस्थितीतही बुमराहने उल्लेखनीय कामगिरी केली आहे:
-
इंग्लंड – ९ कसोट्या, ३७ बळी
-
दक्षिण आफ्रिका – ८ कसोट्या, ३८ बळी
-
न्यूझीलंड – २ कसोट्या, ६ बळी
-
ऑस्ट्रेलिया – १२ कसोट्या, ६४ बळी
जसप्रीत बुमराहने जानेवारी २०१८ पासून आत्तापर्यंत ४५ कसोट्या खेळल्या आहेत, ज्यात त्याने ८६ डावांत २०५ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने १३ वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.
भारताची कसोटी संघाची धुरा यंदा युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आली आहे. गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये १७ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याच्या मिशनवर उतरणार आहे. यापूर्वी २००७ साली राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघ चार वेळा इंग्लंड दौऱ्यावर गेला, मात्र कसोटी मालिका जिंकण्यात अपयश आले.
यंदा जसप्रीत बुमराहचा अनुभव आणि शुभमन गिलचे नेतृत्व भारतासाठी निर्णायक ठरू शकते.
