१८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) इतिहास रचला आणि आपला पहिला IPL किताब जिंकला! अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात RCB ने पंजाब किंग्जला ६ धावांनी पराभूत करत विजयी मोहोर उमटवली.
या ऐतिहासिक विजयात अष्टपैलू क्रुणाल पांड्याचा मोलाचा वाटा राहिला. त्याने ४ षटकांत फक्त १७ धावा देत प्रभसिमरन सिंह आणि जॉश इंग्लिस यांसारख्या आक्रमक फलंदाजांना माघारी पाठवले.
या विजयानंतर क्रुणाल पांड्या IPL इतिहासात ४ वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. याआधी रवींद्र जडेजा आणि लसिथ मलिंगा यांनीही चार वेळा IPL ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला होता.
IPL मध्ये सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकलेले खेळाडू म्हणजे रोहित शर्मा आणि अंबाती रायडू, ज्यांच्याकडे ६-६ ट्रॉफ्या आहेत. त्यांच्यानंतर महेंद्रसिंग धोनी, कीरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी ५ वेळा विजयाचा स्वाद चाखला आहे.
या सामन्यात RCB ने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १९० धावा केल्या. विराट कोहलीने ४३ धावांची दमदार खेळी केली, तर कर्णधार रजत पाटीदारने २६ धावा जोडल्या.
पंजाब किंग्ज संघ २० षटकांत ७ गडी गमावत १८४ धावांवरच थांबला. त्यांच्या विजयासाठी शशांक सिंगने नाबाद ६१ धावा केल्या, पण सामना जिंकण्यासाठी अपुरा ठरला.
RCB कडून भुवनेश्वर कुमार आणि क्रुणाल पांड्याने प्रत्येकी २ बळी घेतले, तर यश दयाल, जॉश हेजलवुड आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
RCB च्या विजयामुळे केवळ संघाचाच नव्हे तर क्रुणाल पांड्यासारख्या मेहनती खेळाडूचा स्वप्नवत क्षण साकार झाला – ज्याने आता IPL इतिहासात स्वतःचं एक वेगळं स्थान मिळवलं आहे!
