भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज – विराट कोहली आणि रोहित शर्मा – आता टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झालेत. त्यांच्या जाण्याने एक युग संपलं असं वाटतंय, पण इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स एंडरसन मात्र या संधीला वेगळ्या नजरेने पाहतोय. त्याच्या मते, भारतात इतकी अफाट युवा प्रतिभा आहे की कोहली-रोहितच्या जागा भरल्या जातील… आणि भारतीय संघ पुन्हा नव्या जोमाने उभा राहील!
एंडरसन म्हणाला, “विराट हा टेस्ट क्रिकेटमधील सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक होता. त्याची कमतरता निश्चितच भासेल, पण भारताकडे भरपूर टॅलेंट आहे जे ही पोकळी भरून काढेल.”
कोहली आणि एंडरसन यांच्यात टेस्ट क्रिकेटमध्ये एक जणू वैरच होतं! अनेकदा विराट त्याच्यावर भारी पडला, आणि काही वेळा एंडरसनने कोहलीला झुकवलं. आकडेवारी सांगते की एंडरसनने विराटला ७ वेळा बाद केलं, तर विराटने त्याच्याविरुद्ध ३०५ रन्स ठोकले!
रोहितचाही एंडरसनने घेतला उल्लेख…
टॉकस्पोर्टवरील एका मुलाखतीत एंडरसन म्हणाला, “रोहितच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला नवा कर्णधार मिळेल. IPL मधून अनेक आक्रमक, युवा खेळाडू समोर येत आहेत. टेस्ट संघ आता अधिक आक्रमक होत चालला आहे. घरच्या मैदानावर भारत आता एक अपराजित किल्ला बनतोय.”
१२ मे रोजी विराट कोहलीने आपला १४ वर्षांचा टेस्ट करिअर संपवला. १२३ टेस्ट्स, २१० डावं, ३० शतकं आणि तब्बल ९२३० धावा – ही फक्त आकडेवारी नाही, ही एक जुनूनी सफर होती. विराटने टेस्ट क्रिकेटला जेवढं प्रेम दिलं, तेवढी ऊर्जा फार थोड्या खेळाडूंमध्ये दिसते.
पुढचं मिशन – इंग्लंड दौरा!
जून महिन्यात भारतीय संघ ५ सामन्यांची टेस्ट मालिका इंग्लंडमध्ये खेळणार आहे. रोहित आणि विराटशिवाय हा पहिलाच मोठा दौरा असणार आहे. याच वेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचाही नवीन चक्र सुरू होणार आहे. एंडरसन म्हणतो, “भारतीय संघ आता इतका ताकदवान आहे की इंग्लंडच्या घरच्या मैदानातसुद्धा मोठं आव्हान बनतोय!”
