पाण्यापासून अन्नापर्यंत आणि डिझेलपासून विजेपर्यंत सर्वच बाबतीत भारतावर अवलंबून असलेला बांगलादेश अलिकडे अनेकदा मोदी सरकारला डोळे वटारून दाखवत असतो. भारताकडून जमेल तेवढे लाटायचे आणि संधी मिळताच पाठीत खंजीर खुपसायचा, हीच बांगलादेशची नीती राहिलेली आहे. शेजारी देशांचे हे चाळे भारतासाठी नवे नाहीत; परंतु भारत आता त्यांचे लाड पुरवण्याच्या मानसिकतेत नाही. “दोन्ही देशांचे संबंध परस्पर फायद्याच्या कसोटीवरच उतरले पाहिजेत,” अशी स्पष्ट भूमिका भारताने मांडली आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे—केवळ तुमच्या फायद्यासाठी आम्ही संबंध ठेवणार नाही, फायदा आमचाही झाला पाहिजे. फायदा नसेल तर संबंधही नसतील. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर तारीक रहमान यांना मोदी सरकारने भारतभेटीचे आमंत्रण दिले होते. मात्र ते आले नाहीत; उलट आधी मलेशिया आणि तिथून चीनच्या दौऱ्यावर निघून गेले. आता भारत सरकारने पुन्हा त्यांना ‘ब्रिक्स’ (BRICS) परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेचे यजमानपद यंदा भारताकडे आहे. बांगलादेश ब्रिक्सचा सदस्य नसतानाही भारताने दिलदारपणा दाखवत रहमान यांना पाचारण केले; परंतु तिथेही बांगलादेशने अत्यंत थंडा प्रतिसाद दिला.



