दिल्लीतील पितमपुरा येथे रामलीलेचे आयोजन करणाऱ्या केशव रामलीला कमिटीने दसऱ्याच्या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि इंद्रजितसह कॉकरोच पुतळ्याचे दहन करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु तामिळनाडूमध्ये विरोधी बाकावर बसलेल्या द्रमुक पक्षाने कॉकरोच जनता पार्टीचे आधीच दहन केले आहे. तेही पाठिंबा जाहीर करून. एखाद्या संघटनेच्या सगळ्या मागण्यांना पाठिंबा देऊनही त्यांची कबर कशी खणता येते, याचे उत्तम उदाहरण द्रमुकचे नेते एम.के.स्टॅलिन यांनी दिलेले आहे. जगभरात सध्या ज्या काही घटना घडतायत, त्या पाहता अराजकवाद्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पॅलेट गन चालवल्या तरीही जनता समर्थन करेल. दिपकेचे वाईट दिवस सुरू झालेले आहेत. १७ ऑगस्ट रोजी द्रमुक खासदारांची बैठक झाली. लोकसभेचे २२ आणि राज्यसभेचे ८ खासदार यात सामील होते. पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी खासदारांना मार्गदर्शन केले. दोन महत्त्वाच्या घोषणा या बैठकीत करण्यात आल्या. पहिली घोषणा यापुढे काँग्रेससोबत जायचे नाही. दुसरी घोषणा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा. या दोन घोषणांचे अनेक अर्थ निघतात. द्रमुक काँग्रेससोबत जाणार नाही म्हणजे इंडिया आघाडीतही द्रमुक नसणार. बैठकीत तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरू करून द्रमुकने यावर शिक्कामोर्तब केले आहे. तिसरी आघाडी म्हणजे काँग्रेस आणि भाजपेतर पक्षांची मोट. तिसरी आघाडी स्थापन झाली तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कबर खणली जाईल. हा काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्या बेभरवशी राजकारणाला मोठा धक्का आहे. चुकीची रणनीती आणि अहंकारामुळे राहुल गांधी यांनी शत्रूंची संख्या वाढती ठेवलेली आहे. प.बंगालच्या निवडणुकांच्या आधी राहुल गांधी यांचा पंगा ममता बॅनर्जी यांच्याशी होता. या निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपाएवढाच विरोध ममतांचा केला होता. ममतांच्या कारभारामुळे भाजपाला संधी मिळाली, अशी टीका त्यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीनंतर विजय जोसेफ यांच्या टीव्हीके या पक्षाला मिठ्या मारून राहुल गांधी यांनी द्रमुकलाही दगा दिला.



