भारत आणि अमेरिका व्यापार करार हा गेले काही दिवस चर्चेचा मुद्दा बनला आहे. आज उद्या कधीही दोन्ही देशात हा करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका बाजूला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सुरू असलेली दमबाजी, अमेरिकी सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी भारतावर ५०० टक्के टेरीफ लावण्यासाठी मांडलेले विधेयक, या पार्श्वभूमीवर भारताने अगदीच थंड परंतु ठाम अशी भूमिका घेतली आहे. डोक्याला घोडा लावून वाटाघाटी नको, आम्ही तुमची डेड लाईन फार मनावर घेत नाही, हे भारताने स्पष्ट केले आहे. वाणिज्य मंत्री पियूष गोयल वारंवार हेच सांगतायत. २ टक्क्यांचा माज सहन करण्यास भारत तयार नाही. हे दोन टक्क्यांचे गणित लक्षात घेण्याची गरज आहे. भारत रशियाकडून तेल विकत घेतो, शस्त्र विकत घेतो हे अमेरिकेला मान्य नाही. अमेरिकेने दिलेला एफ-३५ विमाने विकत घेण्याचा प्रस्ताव भारताने फार मनावर घेतला नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात ही ऑफर दिली होती. उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.वान्स यांच्या भारत दौऱ्याच्या वेळी ही ऑफर पुन्हा एकदा देण्यात आली. केरळच्या विमानतळावर गेले १३ दिवस भिजत पडलेल्या एफ-३५ ची परीस्थिती पाहून भारत आता या विमानांचा स्वप्नातही विचार करण्याची शक्यता नाही. त्यामुळे अमेरिकेचे नेते बिथरले आहेत. लिंडसे ग्रॅहम भारतावर ५०० टक्के टेरिफ लावण्याचे खासगी विधेयक मांडतात आणि त्याला ८० सिनेटरचे समर्थन मिळते ही काही सामान्य बाब नाही. अमेरिका अशा अनेक खटपटी पटपटीतून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करते आहे.
