इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात राज्यात वाद सुरु आहे. हिंदी सक्ती नसून ती ऐच्छिक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. परंतु, यावरून सध्या राजकारण केले जात आहे. या मुद्यावरून आज (२६ जून) मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, हिंदी भाषा आम्हाला मान्य नसल्याचे सांगत आंदोलन करण्याचा इशारा दिला, मनसेनेतर यासाठी ६ जुलै ची तारीख घोषित केली. ठाकरे बंधूंच्या या भूमिकेवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुद्दा असो वा नसो, लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. राज्यात सरकार विरोधी मुद्दा शिल्लक नसल्यामुळे आता भाषेच्या मुद्द्यावर वातावरण निर्मिती करण्याचा काहीजण प्रयत्न करतायेत, असे भातखळकर म्हणाले आहेत.
एबीपी माझाशी संवाद साधताना ते म्हणाले, राज्यातील विरोधी पक्षांना गेले काही वर्षे विषयच भेटत नाहीयेत. त्यामुळे नसलेले विषय तयार करायचे आणि त्याविषयावर आंदोलन करायचे. अर्थात देशात लोकशाही आहे, भारतात भाजपाचे राज्य आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे.
राहुल गांधी आरोप करत आहेत. निवडणुकीत काही गडबड आहे म्हणून केलेली याचिका उच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली. काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्ष सांगत होते कि ईव्हीएममध्ये गडबड आहे. आता ईव्हीएमचा विषय संपला, उच्च न्यायालयाने फटकार दिली. आयोग सांगतयं तुम्ही आम्हाला येवून भेटा, काय तुमचं म्हणणं आहे ते सांगा. त्यावर उत्तर देतो. आयोगाने उत्तरे पण दिलेली आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे कि केंद्र सरकारने त्रीभाषा सूत्र घेतलेले आहे. सूत्रानुसार हिंदी भाषा सक्तीची नाहीये, असे भातखळकर म्हणाले.
राज ठाकरे यांनी आवाहन केले आहे कि एक मराठी नागरिक म्हणून सर्व पक्षीय मतभेत बाजूला ठेवून ६ जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चेमध्ये सहभागी व्हावे. यामध्ये भाजपाची भूमिका काय असेल?, असा प्रश्न अतुल भातखळकर यांना विचारले असता. ते म्हणाले, जी सरकारची भूमिका आहे तीच भाजपाची आहे. महाराष्ट्रात मातृभाषा आणि देशभरातमध्ये त्या-त्या राज्याची मातृभाषा सक्तीचे करण्याचे काम भाजपाच्या सरकारने केले आहे, त्यासाठी सरकारचे अभिनंदन केले पाहिजे.
हे ही वाचा :
आयटीआय विद्यार्थिनींसाठीही ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेचा लाभ द्या!
मुंबई आयआयटी कोणाच्या रडारवर? घुसखोरी की घातपात?
“भोंगे मुक्त मुंबई”, मशिदींवरील १५०० भोंगे उतरवले!
शिक्षणमंत्री दादा भुसे – राज ठाकरे भेटीत तोडगा नाही; मनसेचा ६ जुलैला मोर्चा
राज्यात त्रीभाषा सूत्रानुसार सर्व बोर्डात मराठी सक्तीचे करण्याचे काम आमच्या सरकारने केले. येणाऱ्या काळामध्ये राज्यात मेडिकल, इंजिनिअरींग, वकिली हे सर्व कोर्सेस मराठीत शिकायला मिळणार आहेत, अशी त्या धोरणाची रचना आहे. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे. विरोधकांना माझे आवाहन आहे की नसलेले विषय बनवू नका. कारण जनता काही भुलणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतायेत आणि मराठी भाषे विषयी कळवळ्याने बोलताहेत. ज्या काँग्रेसने मराठी भाषेचा कायम द्वेष केला, महाराष्ट्राचा द्वेष केला, भाषावार प्रांत रचना पूर्ण देशात पंडित नेहरूंनी लागू केली. पण या देशातले एकमेव राज्य होते, ज्या राज्याला भाषिक राज्य लागू केले नाही, तो म्हणजे आपला महाराष्ट्र.
नेहरुंना आणि कॉंग्रेसला महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी इतका द्वेष होता. आणि त्याच्यातून संयुक्त महाराष्ट्र समिती निर्माण झाली, आंदोलन झाले आणि त्यातून मराठी माणसाला आपल्या भाषेचे राज्य मिळाले. त्यामुळे कॉंग्रेस बरोबर जाऊन मराठी भाषेच्या स्वाभिमानाविषयी बोलणे हे केवळ राजकारण आहे, याच काँग्रेस वाल्यांमुळे १०५ हुतात्मा मराठी राज्याकरिता झाले आहेत. हे राज्याची जनता विसरलेली नाही, विसरणार नाही, असे भातखळकर म्हणाले.
मुद्दा असो वा नसो, लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. राज्यात सरकार विरोधी मुद्दा शिल्लक नसल्यामुळे आता भाषेच्या मुद्द्यावर वातावरण निर्मिती करण्याचा काहीजण प्रयत्न करतायत. pic.twitter.com/e0yadDZlm3
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 26, 2025







