राज्य शासनाने सुरू केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजना ही शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक स्तुत्य उपक्रम मानली जात आहे. या योजनेअंतर्गत बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना एसटी बसने मोफत प्रवासासाठी मासिक पास दिला जातो. मात्र, आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च होत असल्याची बाब समोर आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आयटीआय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे महामंत्री वैभव सोलणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे या योजनेत आयटीआय विद्यार्थिनींनाही समाविष्ट करण्याची ठाम मागणी केली आहे.
सोलणकर म्हणाले, “शालेय विद्यार्थिनींप्रमाणेच आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही दररोज प्रवास करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींना अंतर झपाट्याने पार करत आयटीआयपर्यंत पोहोचावे लागते. अशावेळी बसभाड्याचा खर्च पालकांवर येतो, जो कमी करता येणं गरजेचं आहे. बारावीपर्यंत सवलत मिळत असेल, तर त्यानंतरही शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनींनाही समान हक्क मिळायला हवा.”
हेही वाचा :
“भोंगे मुक्त मुंबई”, मशिदींवरील १५०० भोंगे उतरवले!
“भोंगे मुक्त मुंबई”, मशिदींवरील १५०० भोंगे उतरवले!
व्हॉट्सऍप ग्रुुपमध्ये जोडला गेला, १ कोटी गमावून बसला!
जे काही घडलंय ते भारताच्या पथ्यावर पडणारे…
तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, आयटीआय हे केवळ शिक्षण नव्हे, तर विद्यार्थिनींच्या आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणं सरकारचं कर्तव्य आहे.
या मागणीस सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून पाठिंबा मिळत असून, लवकरच याबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशीही संपर्क साधण्यात येणार असल्याचे वैभव सोलणकर यांनी स्पष्ट केले.
