27.5 C
Mumbai
Friday, July 11, 2025
घरसंपादकीयजे काही घडलंय ते भारताच्या पथ्यावर पडणारे...

जे काही घडलंय ते भारताच्या पथ्यावर पडणारे…

भारताने कायम तणाव कमी करण्याची भूमिका घेतली

Google News Follow

Related

बी-२ स्टेल्थ बॉम्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते की, इराणच्या आण्विक आस्थापनांचा आम्ही निकाल लावला. यापुढे इराण अण्वस्त्र बनवणार नाही. हा दावा करण्याचे धाडस तर इस्त्रायल सुद्धा करत नाही. ते फक्त असे म्हणतायत की, आम्ही इराणचा अणु कार्यक्रम दोन-तीन वर्षे मागे ढकलला. अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीला तर वर्षांचा हिशोबही मान्य नाही.

त्यांचे तर म्हणणे आहे, की अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणचा अणुकार्यक्रम फक्त काही महिने मागे सरकला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. हा गोपनीय अमेरिकी माध्यमांनी चव्हाट्यावर आणलेला आहे. बी-२ बॉम्बरचा हल्ला अगदीच वाया गेला असे दावा या अहवालाचा हवाला देऊन ही माध्यमे करीत आहेत. माध्यमांनी तिंबून काढल्यामुळे ट्रम्प भैसाटले आहेत. जे काही घडतंय ते भारताच्या पथ्यावर पडणारे आहे.

आपले म्हणणे भारताने ऐकले नाही, युक्रेन, रशियाने ऐकले नाही, म्हणून ट्रम्प आधीच भडकलेले होते. त्यात युद्धविराम जाहीर केल्यानंतर इस्त्रायल आणि इराणनेही तेच केले म्हणून ट्रम्प यांचा तीळपापड झाला आहे. सीएनएन, न्यूयॉर्क टाइम्ससारख्या माध्यमांनी डीआयएच्या अहवालाचा हवाला देऊन इराणच्या नतांझ, इस्फहान आणि फोर्डोव्ह या आण्विक आस्थापनांवरील अमेरिकी हल्ला अगदीच वाया गेल्याच्या बातम्या दिलेल्या आहेत.

या हल्ल्यामुळे फोर्डोव्हच्या बाहेर पडझड झाली असली तरी आतल्या रचनेला फारसा फटका बसलेला नाही. काही महिन्यातच इराण पुन्हा उठून उभा राहील आणि आपला अणु कार्यक्रम धडाक्यात राबलेल, असा सूर माध्यमांनी लावलेला आहे. बेल्जियममध्ये होणाऱ्या NATO  गटाच्या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाल्यामुळे त्यांच्या तोंडून अभद्र भाषा बाहेर आली.

ट्रम्प यांनी इराण यापुढे कधीच अण्वस्त्र बनवू शकत नाही. हल्ला झालेल्या त्या आण्विक आस्थापनांतून तर कधीच नाही, असा दावा केला आहे. इराणचा आण्विक कार्यक्रम पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा तर इस्त्रायलने सुद्धा कधी केलेला नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या दाव्यावर विश्वास बसणे कठीण आहे.

ट्रम्प यांच्या दाव्याची अमेरिकी माध्यमांनी चिरफाड केलेली आहे. मीडियाने डीआयएच्या गोपनीय अहवालाबाबत बोलताना व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेवीट यांनी दावा केला आहे की, This alleged assessment is flat out wrong and was classified as top secret, but was leaked by an anonymous low level loser in intelligence community…

एकाच वेळी एखादी माहिती फ्लॅट आऊट राँग आणि टॉप सिक्रेट कशी असेल? हे क्लासिफाईड टॉप सिक्रेट असले, तर ते खालच्या पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हाती कसे लागले? असा सवाल करत व्हाईट हाऊसच्या या खुलाशातच गोंधळ आहे, ही बाब एमएसएनबीसी चॅनलने उघड केलेली आहे.

इराणच्या आण्विक आस्थापना नामशेष केल्याचा दावा ट्रम्प करतायत. अमेरिकेचा बराचसा मीडिया या दाव्याची चिरफाड करतो आहे. ही आहे ट्रम्प यांच्या युद्धविरामाची कथा. मायदेशातच ट्रम्प हास्यास्पद बनले आहेत. त्यांचे निकटवर्तीय सोडले तर त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास कोणीही तयार नाही. ट्रम्प त्यांच्या विरोधातल्या माध्यमांचा गार्बेज अर्थात कचरा असा उल्लेख करतायत, माध्यमांकडून त्यांना थापाडे, ठरवण्यात येत आहे. विश्वासार्हता गमावलेले ट्रम्प, हास्यास्पद बनलेले ट्रम्प, पूर्वीच्या तुलनेत कमजोर झालेले आहेत. त्यांना दुसऱ्या देशांचे हिशोब चुकते करण्याआधी त्यांच्या देशातील विरोधाचा सामना करण्यासाठी ताकद खर्च करावी लागणार आहे.

इस्त्रायल- इराण युद्ध सुरू झाल्यापासून भारताची या युद्धाकडे बारीक नजर आहे. हे युद्ध भारताच्या आर्थिक हितांना बाधा आणणारे होते. कारण या दोन्ही देशांमधील बंदरात भारताची गुंतवणूक आहे. चाबहार बंदरात भारताने मोठी गुंतवणूक केली आहे. इस्त्रायलच्या हायफा बंदरात अदाणी उद्योग समुहाची गुंतवणूक आहे. सुदैवाने या १२ दिवसांच्या युद्धात चाबहार किंवा हायफा दोन्ही बंदरांचे नुकसान झालेले नाही. दोन्ही देशांनी एकमेकांच्या देशातील बंदरांवर क्षेपणास्त्र डागलेला नाहीत.

इंडिया मिडल इस्ट युरोप कॉरीडोअर मध्ये इस्त्रायलच्या हायफा बंदराची मोठी भूमिका आहे. चाबहार बंदरातून मध्य आशिया मार्गे रशियापर्यंत व्यापाराचा विस्तार करणाऱ्या इंटर नॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्स्पोर्ट कॉरीडोअर हा दुसरा मार्ग भारतासाठी महत्वाचा आंतरराष्ट्रीय मार्ग आहे. भारताचे आर्थिक प्रभाव क्षेत्र व्यापक करणारे, जगातील बाजारपेठ भारताच्या अधिक जवळ आणणारे हे मार्ग आहेत. इस्त्रायल आणि इराणमध्ये हाणामारी सुरू असल्यामुळे या दोन्ही प्रस्तावित मार्गांचे भवितव्य अंधारात होते. युद्धबंदी नंतर ही समस्या सुटणार आहे.

हे ही वाचा:

बारामतीत अजित पवारांचा ‘मतांचा कारखाना’, शरद पवारांचे पॅनल पराभवाच्या छायेत!

युकेचे प्राणघातक एफ-३५ जेट १० दिवसांपासून केरळमध्ये करतेय काय? 

व्हिवा ग्रुपचे मालक मेहुल ठाकूर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

महिलांच्या हक्कांवर गदा आणणारी ‘खुत्बा शादी’

हे युद्ध जागतिक समीकरणांची फेररचना करणारे ठरले आहे. ट्रम्प यांचा बेभरवशी कारभार लक्षात आल्यामुळे चीनला भारतासोबत चांगले संबंध ठेवणे भाग पडत आहे. ट्रम्प यांनी टेरिफ युद्ध छेडल्यानंतर चीनचे बारा वाजले आहेत. चीनी अर्थकारणाला उतरती कळा लागलेली आहे.

चीन आपल्या देशात निर्माण होणारा माल विकण्यासाठी एका नव्या बाजारपेठेच्या शोधात आहे. भारत आपल्याला तारू शकतो, हे चीनला ठाऊक आहे. इराण-इस्त्रायल संघर्षाच्या काळात पाकिस्तानने जे काही दिवे लावले ते चीनच्या नजरेतून सुटलेले नाहीत. चीन ज्याला आपला पिट्ठू समजत होता, त्या पाकिस्तानने या युद्धात अमेरिकेचे जोडे उचलणे चीनला अजिबात सहन झालेले नाही.

ऑपरेशन सिंदूरच्या काळात इराणने पाकिस्तानची कड घेतली होती. त्याच पाकिस्तानने इराणच्या पाठीत खंजीर खुपसला. इराणच्या आण्विक आस्थापनांवर हल्ला करणाऱ्या अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सना आपले हवाई क्षेत्र वापरू दिले. आपल्या टेहळणी विमानांच्या माध्यमातून पाकिस्तानने इराणच्या सीमेवर हेरगिरी केली आणि ही माहिती अमेरिकेला पुरवली.

पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या अमेरिका भेटीनंतर अमेरिकेने इराणवर हल्ला केला होता, ही बाब इराण कधीही विसरू शकणार नाही. इराण याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. येत्या काळात पाकिस्तानच्या एका बाजूला अफगाणिस्तान, दुसऱ्या बाजूला भारत आणि तिसऱ्या बाजूला इराणकडून चेपला जाणार आहे.

बलोचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याला सुद्धा या घडामोडींमुळे बळ मिळण्याची शक्यता आहे. ज्या चीनसोबत इराणचे मेतकूट होते, त्यांनी सुद्धा होर्मुझचा सामुद्रधनी बंद करण्याची घोषणा केल्यानंतर इराणला दम भरला होता. या युद्धात भारताने इराणची मदत केली नसेल, परंतु इराणला कोणताही उपद्रव केला नाही. भारताने कायम तणाव कमी करण्याची भूमिका घेत, दोन्ही देशांमध्ये समतोल साधलेला आहे. जो येत्या काळात आपल्या पथ्यावर पडणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा