महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेवरून रणकंदन माजले आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा समन्वयक समितीच्या आंदोलनात सहभागी होण्याचे ठरविले आहे. ७ जुलैला हे आंदोलन आझाद मैदान येथे होणार असून त्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठा सहभागी होणार आहे. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, २९ जूनला सभा आणि ७ जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षीय भेद विसरून सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्यिक, खेळाडू – सगळ्यांनी मराठीसाठी पुढं यावं.
उद्धव ठाकरे आणि मराठी भाषा समन्वय समितीची त्याआधी बैठक झाली. त्यानंतर मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जर जाहीर केलं की, मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही किंवा होऊ देणार नाही त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची गरज नाही. हे दळण कशासाठी दळताय. भाजपने जी काही घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे तर आता बाटेंगे तो कटेंगे आणि काटेंगे असं त्यांचं धोरण दिसत आहे. सर्व भाषिकांमध्ये मिठाचा नाहीतर विषाचा खडा ते टाकत आहे. आम्ही हिंदी भाषेला विरोध केलेला नाही तर हिंदी सक्तीला विरोध केलेला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदीची सक्ती करणे म्हणजे भाषिक आणीबाणी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
“भोंगे मुक्त मुंबई”, मशिदींवरील १५०० भोंगे उतरवले!
व्हॉट्सऍप ग्रुुपमध्ये जोडला गेला, १ कोटी गमावून बसला!
हे भय ट्रम्प यांना छळत राहणार |
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीत एका वीटभट्टी कामगाराने बिबट्याला लोळवले
उद्धव ठाकरेंनी सांगितले की, हिंदी शिकली नाही म्हणजे आम्हाला कोणाला हिंदी येत नाही असं नाही. मी मुख्यमंत्री असताना मला नाईलाजाने मराठी भाषेची सक्ती करावी लागली होती. कारण हे लोक मराठी भाषेवर अतिक्रमण करत होते. दुकानाच्या पाट्या मराठीत पाहिजेत, मराठी भाषा ही व्यवहारात आली पाहिजे, पण याविरोधातही काही लोक कोर्टात गेले होते. ते कुणाचे पाठीराखे होते आता उघड झालं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्हाला हिंदीचं वावडं नाही पण हिंदी सक्तीची म्हणजे याचा अर्थ तुमचा छुपा अजेंडा जो आहे, एक निशाण, एक प्रधान आणि एक विधान. नड्डाही बोलले होते की, देशात एकच पक्ष राहणार म्हणजे हे सगळं एकाधिकारशाही कडे चाललं असल्याचं म्हणत भाजपवर ठाकरेंनी टीका केली.
