27.5 C
Mumbai
Monday, July 14, 2025
घरसंपादकीयमुंबई आयआयटी कोणाच्या रडारवर? घुसखोरी की घातपात?

मुंबई आयआयटी कोणाच्या रडारवर? घुसखोरी की घातपात?

अटक केलेल्या बिलालचे प्रकरण माहिती चोरणाऱ्या प्रकारातले आहे काय?

Google News Follow

Related

देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या आयआयटीच्या कॅम्पसमध्ये एक संशयास्पद प्रकार उघड झाला आहे. पवईतील या शिक्षणसंस्थेत बिलाल नावाचा एक तरुण दोन आठवडे मुक्काम ठोकून होता. देशातील आयआयटी या डिफेन्स टेक्नोलॉजी अर्थात संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील अग्रगण्य संस्था डीआरडीओ सोबत अनेक महत्वाच्या प्रकल्पांवर काम करतात. मुंबई आयआयटी याला अपवाद नाही. त्यामुळे इथे झालेली घुसखोरी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. बिलालच्या चौकशीत समोर आलेली माहिती लक्षात घेता, एक मोठा गेम उघड होण्याची शक्यता आहे.

मंगळूरचा निवासी असलेला बिलाल अहमद तेली हा २२ वर्षीय तरुण आधी सुरतला जातो नंतर मुंबईत दाखल होतो. पवईच्या आयआयटी कॅम्पसमध्ये दोन आठवडे मुक्काम करतो. रात्री विद्यार्थ्यांना बसायला ठेवलेल्या सोफ्यावर झोपतो. दिवसा तिथे लेक्चर ऐकायला जातो.

एका महिला प्रोफेसरला त्याचा संशय येतो. त्याला हटकल्यावर तो पळून जातो. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने दुसऱ्या दिवशी त्याला त्याच वर्गात पकडले जाते. १७ जून रोजी पोलिस त्याला अटक करतात. चौकशी केल्यावर त्याने काही बोगस कागदपत्रांच्या आधारे इथे प्रवेश मिळवल्याचे लक्षात येते. आपले शिक्षण बारावी पर्यंत झाले होते, उच्च तांत्रिक शिक्षणाची आवड असल्यामुळे आपण इथे घुसखोरी केली असे तो कबूल करतो. ही काही थ्री इडियटमधल्या रॅन्चोची स्टोरी नाही. हा प्रचंड गोलमाल असलेला मामला आहे.

बिलालने सांगितले आहे, त्यावर विश्वास ठेवायचा तर हा शिक्षणाच्या ओढीमुळे इथे आलेला एक विद्यार्थी असल्याची कहाणी समोर येते परंतु हे खरे नाही. आयआय़टी ही शिक्षण संस्था संशोधक निर्माण करते. अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील संशोधनाचे काम इथे सुरू असते. काही दिवसांपूर्वी डीआरडीओ आणि आयआयटी दिल्लीने संयुक्तपणे क्वांटम मेसेजिंगचे एक मॉडेल तयार केले. ऑप्टिकल फायबर वायरचा वापर न करता तुमचा मेसेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचे हे तंत्र आहे. मध्ये कुठेही मेसेजमध्ये छेडछाड झाली तर हा मेसेज नष्ट होणार. लष्कर, संशोधन, सरकारचे गोपनीय संदेश याचे आदानप्रदान कऱण्यासाठी हे तंत्रज्ञान अतीव उपयुक्त आहे. मुंबई आय़आय़टी क्षेपणास्त्र, अवकाश यान, प्रक्षेपकांसाठी उपयुक्त अशी प्रप्लशन टेक्नोलॉजी आणि एरो इंजिअरींगच्या क्षेत्रात २०१६ पासून डीआरडीओसोबत एकत्रितपणे काम करते आहे. अशा ठिकाणी एक आगंतुक येतो आणि दोन आठवडे मुक्काम करतो ही बाब निश्चितपणे संशयास्पद आहे.

बिलालवर बनावट कागदपत्र बनवणे, दुसऱ्याच्या हद्दीत घुसखोरी करणे, फसवणूक आदी प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला चौकशीसाठी १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. लक्षात घ्या खूनाच्या गुन्ह्यातही पहील्याच वेळी तपासासाठी दोन आठवड्याची पोलिस कोठडी दिली जात नाही. बिलालला ती देण्यात आली. शिवाय याप्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचच्या इंटलिजन्स युनिटकडे सोपवण्यात आला ही बाब सामान्य नाही. एटीएसचे अधिकारीही तपासात सामील आहेत. याचा अर्थ प्राथमिक अंदाजानुसार यात दहशतवादाचा एंगल आहेच.

बिलालकडे तब्बल २१ इमेल आयडी, अनेक फोन नंबर असल्याचे उघड झाले आहे. आयआयटीतील टॉपरची माहिती त्याच्याकडे सापडली आहे. आयआयटीच्या कॅम्पसचे अनेक व्हिडियो त्याने तयार केले होते. त्यात सर्व प्रवेशद्वारांचा समावेश होता. पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी त्याने मोबाईलची व्यवस्थित साफ सफाई केल्याचे उघड झाले आहे. म्हणजे मोबाईलमध्ये असलेली माहिती नष्ट कऱण्यात आली आहेत. त्यात फोटो, व्हीडियो, मेसेजेसचा समावेश आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बिलाल बाहेर संवाद साधण्यासाठी सिग्नल, आय़एमओ सारख्या एपचा वापर करत होता, ही बाबही स्पष्ट झालेली आहे. या एपवर संवाद साधल्यास त्याचा माग काढणे किंवा रेकॉर्डींग शक्य होत नाही. दोन नंबरचा धंदा करणारे गुन्हेगार, दहशतवादी या एपचा संवादासाठी वापर करतात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा बिलाल गेल्या वर्षी आयआयटीच्या कॅम्पसमध्ये महिनाभर राहून गेला होता.

उच्च तंत्रज्ञानाची आवड असलेला हा तरुण कर्नाटकातला आहे, जो कधी काळी स्टुडण्ट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमीचा गढ होता. इथे मोठ्या प्रमाणात बंदी घातलेल्या पीएफआयच्या कारवायाही चालतात. बिलालला शिक्षणाची मोठी हौस आहे, हे क्षणभर मान्य केले तरीही तो कर्नाटकातील एखाद्या संस्थेत अशी घुसखोरी न करता थेट मुंबईत दाखल होतो, आयआयटीत शिरकाव करतो. तोही सलग दुसऱ्यांदा. ही बाब चकीत करणारी आहे. एखाद्या तरुणाकडे २१ इमेल आयडी असणे, अनेक मोबाईल असणे, संवादासाठी त्याने सिग्नलसारख्या एपचा वापर करणे, अटक होणार हे लक्षात आल्यावर मोबाईलवरचा सगळा डेटा त्याने नष्ट करणे ही सामान्य बाब निश्चितपणे नाही.

शिकण्याची ओढ असल्यामुळे आलेला एक तरुण हे सगळे धंदे कशासाठी करेल? दोन गोष्टी काही वेगळ्याच बाबीकडे इशारा करतायत. एक तर त्याच्याकडे सापडलेला आयआयटीतील टॉपरचा डेटा. आणि कॅम्पसचे व्हिडीयो बनवल्याची त्याची कबूली. आयआयटीचे टॉपर एखाद्या संरक्षण विषयी प्रकल्पाशी संबंधित होते का? हा प्रश्न महत्वाचा आहे. या तरुणांची माहिती का जमवण्यात आली? ती कोणासाठी जमवण्यात आली. ती आधीच कोणाला पुरवण्यात आली आहे का? या तरुणांच्या जीविताला काही धोका आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत. बिलालने बनवलेले कॅम्पसचे व्हीडियो इन्स्टाग्रामवर टाकण्यासाठी असतील, यावर एखादा मूर्खच विश्वास ठेवू शकतो.

हे ही वाचा:

ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत-पाक युद्धात मीच केली मध्यस्थी!

“भोंगे मुक्त मुंबई”, मशिदींवरील १५०० भोंगे उतरवले!

‘दहशतवादाची केंद्रे आता सुरक्षित नाहीत’

जे काही घडलंय ते भारताच्या पथ्यावर पडणारे…

या सगळ्या घटनाक्रमामुळे आयआयटीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या संस्थेत देशाच्या संरक्षणाशी संबंधित संशोधन चालते, तिथे एक तरुण येतो मुक्काम ठोकतो. हे सलग दुसऱ्या वर्षी होते हे केवळ धक्कादायक आहे. केवळ देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नाही तर तिथे संशोधन कऱणाऱ्या युवा संशोधकांच्या दृष्टीनेही. उद्या त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला किंवा त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण झाल तर त्याला जबाबदार कोण?  एखाद्या महत्वाच्या आस्थापनेत अशा प्रकारची घुसखोरी होते तेव्हा आतला एखादा माणूस किंवा गट सामील आहे, का असा प्रश्न निर्माण होतो. तपास यंत्रणा त्या दृष्टीनेही निश्चितपणे चौकशी करतील.

देश संशोधनाच्या क्षेत्रात भरारी घेण्याचा प्रयत्न करतोय. मेहनतीने केलेल्या या संशोधनावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सातत्याने होतो आहे. देशातील अनेक भागात संरक्षण क्षेत्राशी संबंधित माहिती चोरून ती विकणाऱ्या लोकांना अटक होते आहे. बिलालचे प्रकरण त्यातले एक असण्याची शक्यता आहे. तपासात काय ते उघड होईल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा