पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हैदराबादच्या चारमिनार परिसरात झालेल्या भीषण आग दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेत जळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि जखमींसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अधिकृत एक्स (पूर्वीचा ट्विटर) हँडलवरून ही माहिती देण्यात आली. पोस्टमध्ये लिहिण्यात आलं – “हैदराबादमधील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूमुळे अत्यंत दु:ख झालं आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो. जखमी व भाजलेल्या नागरिकांच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. PMNRF कडून प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबाला २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपये मदत देण्यात येईल.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी हैदराबादमध्ये चारमिनारजवळील गुलजार हाऊस भागातील एका इमारतीत भीषण आग लागली. या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून काही इतरजण जखमी झाले आहेत. ही घटना घडताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि व्यावसायिक भागातील गर्दीच्या गल्लीमधून अडकलेल्या काही लोकांना वाचवले. आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले होते, ज्यामुळे काहीजण बेशुद्ध झाले. घटनास्थळी मोत्यांचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याचे कुटुंब आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाच्या कुटुंबातील सुमारे ३० लोक उपस्थित होते. “मोदी पर्ल्स” नावाची मोत्यांची दुकान या इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर होती आणि व्यापाऱ्याचे कुटुंब व काही कर्मचारी पहिल्या मजल्यावर राहत होते. आग विझवण्यासाठी आठ अग्निशमन इंजिन्स तैनात करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
हेही वाचा..
देशहिताबाबत काँग्रेसला काही बोलताच येत नाही
प. बंगालात बनावट आधार रॅकेटचा पर्दाफाश
भारतविरुद्ध जाणे बांग्लादेशसाठी योग्य नाही
सरस्वती विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना कलमा म्हणायला लावला, मुस्लीम शिक्षिकेची हकालपट्टी!
केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर ‘एक्स’ वर पोस्ट करत माहिती दिली की, “हैदराबादच्या चारमिनारजवळील गुलजार हाऊस येथे दुर्घटनास्थळाची पाहणी केली. बचाव व मदत कार्यांची माहिती घेतली व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मी त्यांना तातडीने वैद्यकीय मदत व इतर सहकार्य करण्याचे निर्देश दिले. भारत सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल. मी राज्य सरकारला विनंती करतो की, भविष्यात अशा दुर्घटनांचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी इमारतींच्या अग्निसुरक्षा ऑडिटसह सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या हार्दिक संवेदना आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही या भीषण दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना आगीत अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत.
