मानखुर्द- शिवाजी नगर मतदार संघातून निवडून आलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गुणगाण गात औरंगजेब एक चांगला प्रशासक होता असे म्हटले होते. ३ मार्च रोजी सुरु झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना औरंगजेबाचे कौतुक केले होते. या वक्तव्यानंतर राज्यभारातून त्यांच्यावर टीका केली जात होती. विधिमंडळातही या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले. यानंतर सर्व सदस्यांकडून त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली जात होती. आज अखेर अबू आझमी यांच्यावर कारवाई करत विधानसभेतून निलंबन करण्यात आले आहे.
अबू आझमी यांच्या विरोधात विधिमंडळात निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आणि अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले. अबू आझमी यांनी असा दावा केला होता की, औरंगजेबाच्या राजवटीत भारताच्या सीमा अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत पसरल्या होत्या, भारताचा जीडीपी जगाच्या जीडीपीच्या २४ टक्के होता, म्हणून औरंगजेबाला एक चांगला शासक म्हटले पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात कोणताही धार्मिक किंवा सांप्रदायिक संघर्ष नव्हता, तर तो राज्यकारभारासाठीचा संघर्ष होता, असे अबू आझमी यांनी म्हटले.
हे ही वाचा :
कपड्यात लपवून सोने आणणारी पोलीस महासंचालकांची मुलगी जेरबंद!
मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एफडीआय इक्विटी इनफ्लो १६५ अब्ज डॉलरवर
विपश्यनेसाठी जाताना केजारीवालांच्या ताफ्यात दोन-दोन कोटींच्या गाड्या!
अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्यावर टीका करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मविआच्या काही नेत्यांनीही अबू आझमी यांच्या वक्तव्यावर निषेध दर्शवत कारवाईची मागणी केली होती. अखेर आज कारवाई करत विधानसभेतून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच निलंबनाचा कालावधी ठरवण्यासाठी एक समिती देखील गठीत करण्यात आली आहे.