सोन्याच्या तस्करी प्रकरणात कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या रावला अटक करण्यात आली आहे. सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली रान्या रावला बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिनेत्री रान्या रावचे सावत्र वडील. रामचंद्र राव हे कर्नाटकातील आयपीएस अधिकारी आहेत.
सोमवारी रात्री बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिनेत्रीकडून १४.८ किलो सोने जप्त करण्यात आल्यानंतर तिला अटक करण्यात आली. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. अटक केल्यानंतर अभिनेत्री रावला आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
डीआरआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रीच्या वारंवार आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमुळे तिच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी असे नमूद केले की तिने १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास केला होता, ज्यामुळे तिच्यावर बेकायदेशीर कारवायांचा संशय निर्माण झाला होता. ती भारतात परतल्यानंतर कारवाई करत तिला अटक करण्यात आली.
हे ही वाचा :
… म्हणून हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली
विपश्यनेसाठी जाताना केजारीवालांच्या ताफ्यात दोन-दोन कोटींच्या गाड्या!
लष्करी मदत थांबवताच ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास झेलेन्स्की तयार
तपासकर्त्यांनी उघड केले की रावने तिच्या कपड्यांमध्ये सोन्याचे बार लपवले होते. अहवालात असे दिसून आले आहे की तस्करी केलेले सोने मोठ्या प्रमाणात तिच्या जॅकेटमध्ये लपवले गेले होते.
दरम्यान, ३३ वर्षीय अभिनेत्री रान्या राव ही कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. ते कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळात पोलीस महासंचालक (डीजीपी) पदावर कार्यरत आहेत. अभिनेत्रीच्या या तस्करीबाबत तिच्या वडिलांना माहिती आहे का?, याचा तपास पोलीस करत आहेत.