भारताचा शेअर बाजार जबरदस्त आगेकूच करतोय. त्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे, एकेकाळी मूठभर श्रीमंत लोकांच्या क्लबसारखे स्वरुप असलेला शेअर बाजार आता कोट्यवधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. पगारदार माणूस सुद्धा आज बाजारात ‘एसआयपी’ करत असेल तर त्याच्यापर्यंत बाजार पोहोचवला कोणी? हा प्रश्न येतोच. यादी मोठी आहे. परंतु झी बिझनेसचे प्रबंध संपादक अनिल सिंघवी यांच्या नावाशिवाय ही यादी पूर्ण होऊ शकत नाही.
माझी त्यांची भेट बरेचदा विमानतळावर किंवा विमानातच झाली. कधी कधी एखाद्या कार्यक्रमानिमित्त. फोनवर संपर्क असतोच. आमच्या न्यूज डंकाच्या स्टुडीयोलाही त्यांनी भेट दिलेली आहे. मी त्यांचा एक चाहताही आहे. त्यांचे बाजाराबद्दलचे विचार मला भावतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य, बोलण्यातला मधाळपणा हे त्यांच्या यशाचे रहस्य आहे, असे मला नेहमीच वाटते. त्यांच्या अचूक विश्लेषणासह गावखेड्यापर्यंतच्या बाजारप्रेमींवर त्यांच्या मधाळ आवाजाचेही गारुड आहे.
शेअर बाजाराचा गुंतवणूकदार फक्त मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, दिल्ली पुरता मर्यादित राहिलेला नाही. तो झारखंड, छत्तीसगढ, बिहार सारख्या राज्यांतील छोट्या शहरांमध्ये सुद्धा वाढतो आहे. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार लोक मार्केटमध्ये पैसा गुंतवत असतात. देशाच्या अर्थकारणाला हातभार लावत असतात. पूर्वी बाजाराचे विश्लेषण फक्त इंग्रजीतून चालत असते. त्यामुळे ते एका मर्यादीत वर्गापर्यंत पोहोचत असे. ते हिंदीत सोप्या भाषेत आणण्याचे काम ज्यांनी केले, त्यात सिंघवी यांचे नाव खूप वरचे आहे. टीयर-२, टीयर-३ शहरांमध्येच नाही तर जिथे इंटरनेट आणि वीज आहे, अशा गावांमध्ये सुद्धा लोक सिंघवी यांचे मार्केट स्ट्रेटेजी, स्टॉक ऑफ दे डे, एडीटर्स टेक आदी शोज पाहातात.
त्यांचे बोलणे मृदू आहे, मधाळ आहे, सोपे आहे. बाजाराची जटील भाषा सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. नियमितपणे तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन ते कायम बाजाराचा ‘टॉप एंगल’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. सतत वर-खाली होणाऱ्या बाजाराचे विश्लेषण करताना विश्वासार्हता जपणे हे सोपे नाही. आजवर तरी त्यांना हे साधले आहे.
प्रात:स्मरणीय, वंदनीय, हिंदुस्तानचे प्रेरणास्त्रोत महाराणा प्रताप यांचा पदस्पर्शाने पुनीत झालेल्या चितौडगढमध्ये अनिल सिंघवी यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण चेन्नईतील “आश्रम मैट्रिकुलेशन हायर सेकेंडरी शाळेत” झाले. अर्थकारण हा त्यांचा लाडका विषय असल्यामुळे वाणिज्य शाखेची त्यांनी पदवी घेतली, ते चार्टर्ड अकाऊंटण्ट झाले. त्यांनी सीएसही केले.
हे ही वाचा:
हा मार्ग देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने नेतो…
पाकचा बब्बर हा हिंदुस्थानचा गब्बर!
प्रभु श्रीराम यांची नीती नव्या भारताची नीती
प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला कडक आणि तत्पर उत्तर!
सीए, सीएस झालेला माणूस एखाद्या बड्या कंपनीचे ताळेबंद पाहातो. बड्या मल्टीनँशनल कंपन्या, किंवा मोठ्या बँका ही त्याची पसंती असते. यांनी मात्र पत्रकारीतेकडे वळण्याचा निश्चय केला. सीएनबीसीचे कार्यकारी संपादक म्हणून २००४ मध्ये आपली कारकीर्द सुरू केली. १७ वर्षांनंतर ते झी बिजनेसमध्ये दाखल झाले. आजपर्यंत ते तिथे मांड ठोकून बसलेले आहेत. बाजारावरून त्यांची नजर कधीडी ढळत नाही. डाऊ देख कर सोता हू, गिफ्ट निफ्टी को जगाता हू… अभ्यास हा त्यांच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग. त्यांचा दिवस सकाळी पाच वाजता सुरू होता. सात वाजता ते ऑफीसमध्ये दाखल होतात. आठ वाजता त्यांचा पहीला शो असतो.
शेअर मार्केट हा विषय सध्या मध्यमवर्गीय घरांमध्येही चर्चिला जातो. कॉलेजचे विद्यार्थीही यात रुचि घेताना दिसतात. परंतु गावखेड्यातील लोक जर शेअर बाजाराकडे आकर्षित होत असतील तर त्या अनिल सिंघवी यांच्यासारख्या लोकांचीही भूमिका आहे. एके काळी मार्केट एनालिस्ट म्हणजे कोऱ्या चेहऱ्याचे, मला जास्त कळते हे दाखवण्यासाठी क्लिष्ट शब्दांची पेरणी करणारे होते. हे चित्र अनिल सिंघवी यांनी बदलले. माहितीच्या दर्जात कुठेही कमतरता न ठेवता, माहोल थोडा हलकाफुलका, मैत्रीपूर्ण बनवला. त्यांचा सकाळचा शो असा वा रात्रीचा, त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य किंचितही कमी होत नाही. कठीण गोष्टी सोप्या करून सांगण्याच्या हातोटीमुळे हजारो लोक बाजाराशी जोडले जात आहेत. हा बदल त्यांनी घडवलेला आहे. ही शैली त्यांची स्वत:ची आहे. एकदा ते म्हणाले होते ‘नकल कर के आप राजू श्रीवास्तव तो बन सकते है, शाहरुख खान नही बन सकते.’ अस्सलपणा हेच त्यांच्या यशाचे सूत्र आहे.
शेअर बाजाराचे विश्लेषण करताना ‘टेक्निकल’ आणि ‘फंडामेंटल’चा विचार करताना ते ‘सेंटीमेंट’चाही निकष लावतात. त्यांचे हे अत्यंत आवडते काम. लाईट, एक्शन, कॅमेरा शिवाय ते जगू शकत नाहीत. स्टुडीयोत वावरताना आपल्याला सर्वाधिक समाधान लाभते असे ते नेहमी सांगतात. कामावर प्रेम आणि प्रेमाने काम हे त्यांच्या यशस्वी कारकर्दीचे सूत्र आहे. लोकांचे गुंतवणुकीबाबत ज्ञान वाढते आहे. ते विश्रांती घेत असताना त्यांचा पैसा काम करतो आहे. वाढतो आहे. यात अर्थविषयात बातमीदारी करणाऱ्या सिंघवी यांच्या वरीष्ठ पत्रकारांची मोठी भूमिका आहे. त्यांची कारकीर्द अशीच बहरत राहो.
