आशियातील सर्वात मोठा ‘एअर शो’ म्हणजेच ‘एअरो इंडिया २०२५’ आजपासून (१० फेब्रुवारी) बेंगळुरूमध्ये सुरू झाला आहे. बेंगळुरूमधील येलहंका हवाई दल स्टेशनवर एअरो इंडियाच्या १५ व्या आवृत्तीचे उद्घाटन झाले. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘एअर शो’चे उद्घाटन झाले. आजपासून चार दिवस प्रदर्शन चालणार आहे.
‘एअरो इंडिया’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी संरक्षण मंत्री म्हणाले की, “सध्या भारतात महाकुंभ सुरू आहे. मला संगमात स्नान करण्याचा मान मिळाला आहे. संरक्षणमंत्र्यांनी बेंगळुरूमधील एअरो इंडियाचे वर्णन संशोधनाचा कुंभ असे केले. ते म्हणाले, आजपासून एअरो इंडियाच्या रूपात भारतात आणखी एक महाकुंभ सुरू होत आहे, असे मला वाटते.
‘एअरो इंडिया २०२५’ प्रदर्शन १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये, नवी विमाने, शस्त्रे वेगवेगळ्या स्वरूपात प्रदर्शित केली जातात. या प्रदर्शनात पहिल्यांदाच, एअरो इंडिया २०२५ मध्ये जगातील दोन सर्वात प्रगत पाचव्या पिढीतील लढाऊ विमान- रशियाचे सुखोई-५७ (Su-५७) आणि अमेरिकन एफ-३५ लाइटनिंग II यांचा सहभाग दिसून येत आहे. एअरो इंडियाच्या पहिल्या दिवशी, भारतीय हवाई दलाची विमाने १३ वेगवेगळ्या फॉर्मेशनमध्ये उड्डाण करणार आहेत. या एअर शोमध्ये भारताचे स्वदेशी विकसित केलेले सिंगल-इंजिन मल्टीरोल फायटर, एचएएल तेजस देखील आहेत.
हे ही वाचा :
गोवंश हत्येसंदर्भात पीआय बांगर यांच्यावर कारवाईसाठी निवेदन, कधी होणार कारवाई?
महाकुंभात सात हजार हून अधिक महिलांनी घेतला संन्यास!
वांगचुक यांच्या पाकिस्तान भेटीमागे गूढ काय?
राज्यातील तलावांचे डीजिटलायझेशन होणार
परदेशातील हवाई अधिकारी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. १०० हून अधिक मूळ उपकरण उत्पादक (OEM) चे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ५५ मूळ उपकरण उत्पादक हे अमेरिका, युके, फ्रान्स, जपान, रशिया यासह १९ देशांमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ‘एअरो इंडिया’ शोची सुरुवात १९९६ मध्ये बेंगळुरूमधील येलहंका एअरो फोर्स स्टेशनवर झाली. हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसरे सर्वात मोठे एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील प्रदर्शन आहे.