‘हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्रिकेट प्रक्षेपण करताना मराठी समालोचनाचा पर्याय नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली होती. हॉटस्टारसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी समालोचनाचा पर्यायचं नसल्याने मनसेने नाराजी व्यक्त करत थेट हॉटस्टारच्या लोअर परळ कार्यालयात धडक दिली होती. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सहकाऱ्यांसह कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. यानंतर हॉटस्टारने नरमाईची भूमिका घेत मराठी समालोचन पर्याय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
मनसेकडून मराठी भाषा आणि मराठी माणूस यासाठी आक्रमक भूमिका घेतली जाते. दरम्यान, हॉटस्टारवर क्रीडा आणि इतर कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेचा समावेश नसल्याचे लाक्षता येताच मनसे नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरला. कार्यालयाला दिलेल्या भेटीवेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस देखील उपस्थित होते. हॉटस्टारने त्यानंतर यापुढे क्रिकेटच्या सामन्यांचे मराठीत समालोचन दाखवले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर महाराष्ट्रात फक्त मराठी माणूसच माज करणार, असे खोपकर यांनी ठणकावून सांगितले.
हे ही वाचा..
जेपीसीकडून वक्फ विधेयकातील १४ सूचनांना मान्यता; विरोधकांच्या सर्व दुरुस्त्या फेटाळल्या
दिल्लीकरांचे संपूर्ण कुटुंबच केजरीवाल सरकार चालवणार; जाहीरनाम्यात १५ गॅरंटी
महाकुंभमध्ये आलेले तरुण भाविक म्हणतात, पवित्र स्नान केल्यानंतर शांत वाटले
अमेय खोपकर म्हणाले की, आम्ही हॉटस्टारच्या कार्यालयात भेटायला नाही तर थेट धमकी द्यायला आलो होता. महाराष्ट्रात आम्हाला मराठीसाठी भांडायला लागत आहे. महाराष्ट्रात माज फक्त मराठी माणसाने करायचा. इतरांनी माज करायचा नाही. हॉटस्टारने राज ठाकरेंना पत्र दिलं आहे. त्यांनी मराठीत समालोचन करण्याची ग्वाही दिली आहे. हॉटस्टारकडून लेखी आश्वासन मिळालं असून आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचे समालोचन मराठीत होणार. मराठी सोडून सर्व भाषेतून समालोचन सुरू होतं. लेखी आश्वासन दिलं नसतं तर हॉटस्टारच्या काचा खूप महाग आहेत. आता पुढे त्यांच्याकडून मराठी भाषेचा मान राखला जाईल अशी आशा करतो, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.